कात्रज घाटात वाहनचालकांना लुटणाऱ्या टाेळीला पाेलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 04:10 PM2019-08-28T16:10:46+5:302019-08-28T16:13:39+5:30
कात्रज घाटात दबा धरुन बसून वाहनचालकांना लुटणाऱ्या टाेळीला पाेलिसांनी जेरबंद केलं आहे.
पुणे : कात्रज घाटात वाहनचालकांना अडवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. करण सुरेश शिंदे (वय २३), मितेश् सुरेश शिंदे (वय २९, दोघे रा़ जैन मंदिराजवळ, कात्रज), विशाल मोहन बोराणे (वय २५, रा़ वर्वे, ता़ भोर), अमित सुनिल भोरडे (वय २१, रा़ दत्तनगर, कात्रज), शंभुराजे जालिंदर कोंडे (वय २१, रा़ वर्वे, ता़ भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ कोयते, मिरची पुड, दोरी व दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आंबेगाव पठार येथे त्यांनी दहीहंडीच्या दिवशी अशोक मारुती भुरुक (रा़ साईप्रसाद सोसायटी, आंबेगाव पठार) याच्यावर वार करुन पळून गेले होते. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन भारती विद्यापीठ पोलीस त्याचा तपास करीत होते. तपास पथकाचे कर्मचारी कुंदन शिंदे व कृष्णा बढे यांना हे आरोपी कात्रज घाटात वाहनचालकांना अडवून त्यांना लुटण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी रात्री आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली़ कात्रज घाटात निसर्ग हॉटेलच्या पुढे रोडच्या बाजूला असलेल्या जंगलात हे आरोपी दबा धरुन बसलेले पोलिसांना वाहनांच्या उजेडात दिसले, पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत घाटातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना अंधाराचा फायदा घेऊन अडवून लुटण्यासाठी ते तेथे दबा धरुन बसले होते. पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५५ हजार ७१० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, सचिन पवार, राहुल तांबे, गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी, महेश मंडलिक, अभिजित जाधव, योगेश सुळ यांनी केली आहे.