महाळुंगे : खालुंब्रे (ता. खेड) येथे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्यासह दोन पोलीस शिपायांना संतप्त जमावाने गुरुवारी (दि. १४) रात्री नऊच्या सुमारास बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही पोलीस या मारहाणीत जखमी झाले आहेत. देवराम तुळवे व तब्बल २५ अनोळखी पुरुष व त्यांचे साथीदार आणि तीन महिला यांच्यावर मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात मोटार वाहनचालक असलेले पोलीस शिपाई बाळासाहेब खडके यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस कर्मचारी रवींद्र शिनगारे, जीप वाहनचालक खडके अशी मारहाण झालेल्या पोलिसांची नावे आहेत. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार : गुरुवारी (दि. १४) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास खालुंब्रे (ता. खेड) गावातील तुळवेवस्ती येथे तळेगाव चाकण रस्त्याच्या कडेला महिंद्रा ट्रॅक्टरची (एमएच १४ एव्ही ८६८३) धडक बसल्याने मोटारसायकल (एमएच १४ एफझेड २५४७) वरील चालक गंभीर जखमी झाला. मात्र जखमींना मदत न करता संबंधित ट्रॅक्टरचालक देवराम तुळवे पळून जात असल्याचे दिसून आल्याने संबंधित पुणे ग्रामीण पोलीस दलातील एलसीबीचे एक अधिकारी व दोन कर्मचारी यांनी त्यास थांबविले. मात्र, अपघात झाल्यानंतर थांबविल्याच्या कारणावरून चिडलेल्या संबंधित ट्रॅक्टरवरील चालक देवराम तुळवे व त्याच्यासमवेत असलेले अन्य पाच जण व त्यांच्या गावातील सुमारे १५ ते २० साथीदार आणि २ ते ३ महिला यांच्या जमावाने संबंधित पोलिसांना जबर मारहाण केली. मारहाण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत असून पोलिसांनी याप्रकरणी सुमारे पाच ते सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित व्यक्ती साध्या वेशात असल्याने पोलीस आहेत, याची माहिती नसल्याने संबंधित प्रकार घडल्याची माहिती खालुंब्रे (ता. खेड) गावातील नागरिकांनी दिली. पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खालुंब्रे गावात दहशत निर्माण झाली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी अनेकांची शोधाशोध सुरू केली आहे.चाकण पोलिसांशी सातत्याने संपर्क करूनही कोणीही या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार देत पुणे ग्रामीणच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क करून माहिती घ्यावी, असे सांगत कानावर हात ठेवले.
जमावाकडून पोलिसांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:24 AM