"सोनसाखळी हिसकवणाऱ्यांना पोलिसांचा दणका", तर चोरीचे सोने विकत घेणार्या सराफाच्याही आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:25 PM2021-06-09T18:25:01+5:302021-06-09T18:30:48+5:30
सराईत टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का कारवाई
पुणे: दुचाकीची चोरी करुन सोनसाखळी हिसकाविणार्या सराईत टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली आहे. दीपक परशुराम माळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा) आणि मुकेश सुनिल साळुंखे (वय १९, रा. मुंढवा) आणि चोरीचे सोने घेणार्या सराफ हुकुमसिंग भाटी (रा. रक्षकनगर, खराडी, चंदननगर) यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
सोनसाखळी चोरणारे चोरटे हडपसर परिसरात थांबले असल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय गायकवाड व चेतन चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार सराईत गुन्हेगार दीपक आणि मुकेश यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी तब्बल २० ठिकाणांहून सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. दीपक माळी याने टोळी तयार करुन ठिकठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले होते. त्यानंतर त्याने हे सोन्याचे दागिने भाटी याला विकले होते. दीपक माळी याच्याविरुद्ध २०१५ पासून ८ गुन्हे दाखल आहेत. मुकेश साळुंखे याच्याविरुद्ध ७ गुन्हे दाखल आहेत.