पुण्यात डीएसके दाम्पत्याला 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 06:14 PM2018-02-23T18:14:01+5:302018-02-23T18:14:01+5:30
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती कलकर्णी यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला.
पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती कलकर्णी यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला.
डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी शुक्रवारी न्यायालयासमोर केली. यावेळी झालेल्या सुनावणीत कोर्टानेही सरकारी वकिलांनी केलेली मागणी मान्य करत दोघांनाही 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, डीएसके यांची प्रकृती बिघडल्यास रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी देखील देण्यात कोर्टाकडून देण्यात आलेली आहे. गेले काही दिवस डीएसकेंवर सुरुवातीला ससून आणि नंतर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची आज डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.
उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन काढून घेतल्यानंतर शनिवारी (17 फेब्रुवारी) पहाटे डी.एस. कुलकर्णी यांना पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह दिल्लीतून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुण्यात न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. सुनावणीच्या दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी डीएसके यांनी त्यांच्या 7 प्रमुख भागीदार संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा केल्या आहेत. त्यातील मोठा भाग हा त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये वळविला आहे. त्यानंतर त्या खात्यातून तो डीएसके, त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी व इतरांच्या वैयक्तिक खात्यात वळविण्यात आल्याचे सांगितले होते. दरम्यान, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर रात्रीच्या सुमारास डीएसके पोलीस कोठडीत तोल जाऊन पडल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांनी उपचारांसाठी येथील ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डीएसके यांच्या वकिलांच्या मागणीनुसार त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेले दोन दिवस उपचार करण्यात येत होते. मंगळवारी सकाळी 8 वाजता त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वेगवेगळ्या 10 तज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्याचा अहवाल बंद लिफाफ्यात पोलिसांकडे दिला. पोलिसांनी हा अहवाल न्यायालयास सादर केला.