पुणे : येत्या 23 मेला लाेकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर हाेणार आहे. मतमाेजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुण्यात पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ मतदारसंघाची मतमाेजणी हाेणार आहे. शिवछत्रपती क्रिडासंकुल बालेवाडी आणि काेरेगाव पार्क येथील धान्य गाेदाम येथे मतमाेजणी हाेणार आहे. यासाठी माेठ्याप्रमाणावर पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात येणार आहे. दाेन्ही ठिकाणी तीन स्तरात बंदाेबस्त असणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे प्रशासनाने भर दिला आहे.
पुण्यात दाेन ठिकाणी मतमाेजणी हाेणार आहे. दाेन्ही ठिकाणी पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त असणार आहे. प्रत्यक्ष मतमाेजणीच्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात असणार आहेत. त्याबाहेरच्या बाजूला एसआरपीएफचे जवान तर मतमाेजणी ठिकाणाच्या परिसरात स्थानिक पाेलीस तैनात करण्यात येणार आहेत. पुणे आणि बारामती मतमाेजणी केंद्रावर दाेन पाेलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पाेलीस आयुक्त, 15 पाेलीस निरीक्षक, 7 पाेलीस उपनिरीक्षक तर 250 पाेलीस कर्मचारी असणार आहेत. तसेच मावळ आणि शिरुर या मतदारसंघाची मतमाेजणी जेथे हाेणार आहे तेथे एक सहायक पाेलीस आयुक्त आणि इतर सारखाच बंदाेबस्त असणार आहे. सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्या देखील या दाेन्ही ठिकाणी हजर असणार आहेत.
मतमाेजणी कक्षामध्ये काेणालाही माेबाईल फाेन, कॅलक्युलेटर किंवा इतर कुठलिही वस्तू घेऊन जाता येणार नाही. त्याचबराेबर मतमाेजणीच्या दिवशी मतमाेजणी ठिकाणापासून 200 मीटर पर्यंत कुठलिही वाहने लावता येणार नाहीत. पार्किंगची व्यवस्था जेथे करण्यात आली आहे, तेथेच उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना वाहने लावता येणार आहेत. या परिसरामध्ये कुठलाही स्पीकर लावता येणार नाही. तसेच कुठलाही मजकूर या ठिकाणी लिहीता येणार नाही किंवा छापील मजकूर देखील वाटता येणार नाही. शासकीय वाहनांव्यतिरिक्त कुठल्याच वाहनाला या भागात प्रवेश देण्यात येणार नाही. 200 मीटरच्या परिसरात कुठलिही मिरवणुक काढता येणार नाही. तसेच इतर ठिकाणी विजयी मिरवणूक काढायची असल्याच प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.