अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना पोलिसांची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 12:29 AM2020-08-05T00:29:40+5:302020-08-05T00:33:31+5:30
कोणत्याही प्रकारची घोषणा, रॅली अथवा ध्वज संचलन अथवा आरतीचे आयोजन करु नये अशा प्रकारच्या नोटीस पोलिसांनी बजावल्या आहेत.
पिंपरी : अयोध्या येथे राममंदिराचे भूमिपूजन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांना तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काही जणांना नोटीस बजावल्या आहेत. राममंदिर भूमिपूजनानिमित्त भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भोसरीचेआमदार महेश लांडगे यांनादेखील अशीच नोटीस पोलिसांनी बजावली आहे.
अयोध्या येथे राममंदिराचे बुधवारी भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मंगळवारी शहरात विविध भागात रुट मार्च करून शांततेसाठी पोलिसांनी आवाहन केले. कोरोना महामारीमुळे संचारबंदी व जमावबंदीचे आदेश असून पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी आहे. या आदेशाचे देखील पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
कोणत्याही प्रकारची घोषणा, रॅली अथवा ध्वज संचलन करण्यात येऊ नये, तसेच मंदिरांमध्ये आरतीचे आयोजन करु नये, अशा प्रकारच्या नोटीस पोलिसांनी बजावल्या आहेत. कोणाच्याही भावना दुखावतील, अशी कृती करणार नसल्याचे हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लाडू वाटपाचे आयोजन केले आहे. त्यामुळे एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या अनुषंगाने आपण ठिकाणी लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करणार आहात, अशी माहिती मिळाली आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लाडू वाटप करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे लाडू वाटप करू नये. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असे पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
प्रशासनाचा निषेध
पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर प्रशासनाचा निषेध केला जात आहे. प्रभू श्रीराम संपूर्ण देशाची अस्मिता आहे. पाचशे वर्षांनंतर त्यांचे होणारे मंदिर हा आम्हा देशवासीयांचा स्वाभिमान आहे. या मंगल प्रसंगी भूमिपूजन सोहळ्याच्या आनंदात प्रशासन आम्हाला सहभागी होऊ देत नसेल त्याचा विनम्रपणे निषेध करतो, असे संबंधित नोटीसवर नमूद करण्यात येऊन सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात आहे.