पुणे : रात्री उशिरापर्यंत सुरू असणारी चायनीज खाद्यपदार्थांची गाडी पोलिसांनी बंद केली आणि जेवण मिळालेच नाही, या रागातून एकाने चाकूने पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. हल्ल्यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
पोलिस नाईक सचिन उत्तम जगदाळे (वय ३८) असे गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी महानंदेश्वर ऊर्फ मल्या महादेव बताले (वय २४, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लोहगावमधील धानोरी जकात नाका येथील समायरा चायनिंज सेंटरवर शनिवारी रात्री सव्वाअकरा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक सचिन जगदाळे हे लोहगाव पोलिस ठाण्यात मार्शल म्हणून काम पाहतात. धानोरी जकातनाका येथील चायनीज गाडीवर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वादावादी सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यामुळे जगदाळे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चायनीज सेंटर बंद केले. सर्वांना तेथून निघून जाण्यास सांगितले. त्याचवेळी महानंदेश्वर तेथे जेवणासाठी आला. सेंटर बंद केल्याने त्याला जेवण मिळाले नाही. नशेत असलेल्या महानंदेश्वर याने रागाच्या भरात चायनीज गाडीवरील चाकू घेऊन जगदाळे यांच्या डाव्या गालावर वार केला. त्यात जगदाळे हे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी रोहिदास पवार, विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलिस निरीक्षक एम.एस. पाठक यांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिन जगदाळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. विमानतळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.