पुणे : वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचारी पहाटेच्या वेळी घडयाळ् चौकातून भैरोबानाला चौकाकडे जात असताना त्यांना एक मुलगी त्या रस्त्यावर एकटीच फिरताना आढळली. तिच्याशी बोलल्यानंतर ती प्रचंड नैराश्य व मानसिक दडपणात असल्याचे दिसून आले. पोलीसांनी वेळीच तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला त्यांच्यापर्यंत पोहचविले. वडिलांनी तिची समजूत घालून घातल्यानंंतर ती सुखरुप घरी परतली.
पोलीस शिपाई सर्जेराव दडस आणि चालक पोलीस शिपाई राजेश महाजन हे 30 एप्रिल रोजी रात्री दीडच्या सुमारास घडयाळ चौकातून भैरोबानाला चौकाकडे जात होते. साधारण पावणे दोनच्या वेळी त्यांना त्या चौकाच्या पुढे काही अंतरावर 20 ते 22 वर्षांची मुलगी नाईट डेÑसवर फिरताना दिसली. पोलिसांनी तिला इतक्या रात्री कुठे चाललीस असे विचारले असता तिने आपण सहजच फिरत असून आता स्टेशनला जाणार असल्याचे सांगितले. तिला आणखी प्रश्न विचारल्यावर ती समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तिला आणखी विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर ती मुलगी रडु लागली. बोलण्यावरुन ती नैराश्यात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यांना परिस्थितीची माहिती दिली. ते घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मुलीची समजुत घालून तिला गाडीत बसवले. वडिलांनी पोलिसांचे आभार मानत पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र वानवडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना दिले. अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांनी दिली.