पिंपरी : विद्यानगर पोटनिवडणुकीचे मतदान सुरू असताना, त्याच भागात फुलेनगरमध्ये राहाणाऱ्या व हल्ल्यात जखमी झालेल्या आकाश विनोद गायकवाड या तरुणाचा रविवारी ससूनमध्ये मृत्यू झाला. मतदान प्रक्रियेत काही अनुचित प्रकार घडू नये,याची दक्षता घेतली जात असताना, आकाशच्या हल्लेखोरांवर कारवाई करा, तरच मृतदेह नेला जाईल, अशी आग्रही भूमिका त्याच्या नातेवाइकांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही घटना हाताळताना पोलिसांची दमछाक झाली. विद्यानगर पोटनिवडणुकीचे मतदान सुरू होते. ठिकठिकाणी विविध राजकीय पक्षांचे बूथ उभारले होते. पैसे वाटले जात आहेत, मतदारांना धमकावले जात आहे, अशा चर्चा सुरू असल्याने मतदान केंद्रांच्या परिसरात पोलीस जातीने लक्ष देत होते. मतदान सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातच या परिसरात आकाशचा मृतदेह घरी आणल्यानंतर एकच गोंधळ उडाला. (प्रतिनिधी)आकाशवर हल्ला करणाऱ्या, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर कारवाई करा, तरच आकाशचा मृतदेह हलविण्यात येईल, अशी आग्रही भूमिका त्याच्या नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आकाशवर हल्ला करणाऱ्या सर्वच आरोपींवर कारवाई होईल, अशी ग्वाही सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांनी दिली. नातेवाइकांची समजूत काढली.
तणावामुळे पोलिसांची दमछाक
By admin | Published: April 18, 2016 3:00 AM