पोलिसांचा काळ आला; पण वेळ नव्हती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:26 AM2019-02-23T04:26:03+5:302019-02-23T04:26:24+5:30
राजगड पायथा पाल खुर्द येथील भुतोंडे घाटात पोलिसांच्या वाहनास अपघात
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ले पायथ्याच्या भुतोंडे घाटामध्ये बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला; पण प्रसंगावधान दाखवत चालकाने घाटाच्या शेजारील असणाºया झाडावर गाडी घातल्याने मोठा अपघात टळला. गाडी झाडाला अडकल्याने पोलीस जवानांचे प्राण वाचले. या ठिकाणी काळ आला पण वेळ आली नव्हत्याचा प्रत्यय आला.
याबाबत वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वतीने किल्ले राजगड ते रायगड गडकोट मोहिमेसाठी राज्यभरातुन हजारो धारकरी बुधवार (दि.२०)राजगड ते शुक्रवार (दि.२२) केळदपर्यंत दाखल झाले होते यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता तर अनेक पोलीस वाहणे पेट्रोलिंग करत असताना बुधवार (दि.२०)रोजी (एमएच ४२, बी ६७३९) क्रमांकाच्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला; परंतु चालकाने प्रसंगावधान दाखवत घाटाच्या शेजारी झाडावर गाडी घातली व ती गाडी झाडास अडकल्याने मोठा अपघात टळला.
अन्यथा खोल दरीत वाहन कोसळून मोठा अपघात झाला असता. या वाहनामध्ये १४ पोलीस जवान व होमगार्ड होते. यापैकी एका होमगार्डच्या डोक्याला मार लागला तर दोन तीन पोलीस जवांनाना किरकोळ दुखापत झाली व मुका मार लागला आहे. याबाबत वेल्हे पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास वेल्हे पोलीस करत आहे.
मार्गासनी ते राजमार्ग पाल भोसलेवाडी रस्ता फार अरुंद व वेडीवाकडे व चढउताराचा रस्ता आहे. त्यातच या परिसरातील रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. अरुंद रस्ते आहे असल्याने दुसरी गाडी रस्त्यामध्ये बसत नाही. यामुळे धारकºयांच्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. या ठिकाणच्या रस्त्यांची रुंदी वाढवावी व रस्ता दुरुस्त व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून पर्यटक करत आहेत.