पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीसमोर मारहाण : आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:37 PM2018-05-08T18:37:44+5:302018-05-08T18:37:44+5:30
सध्या पुणे शहर भागातील पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षकालाही मारहाण करण्यात आली होती. त्याला आठवडा उलटण्याची आतच दुसरी घटना समोर आली आहे.
पुणे : रस्त्यावर आरडाओरडा करू नकोस या पोलिसाने केलेल्या सूचनेचा राग येऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्याचा हात फ्रॅक्चर झाला असून आरोपी सुरेश आहुजी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एस. एन.लोहोमकर यांनी खडक पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, मीठगंज पोलीस चौकीसमोरील जीत वाईन्स दुकानासमोर सोमवारी (दि.५) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी सुरेश आहुजी हे आरडाओरडा करत होते. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करू नकोस असे पोलीस नाईक एस एन लोहोमकर यांनी सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने लोहोमकर यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही त्या मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावर लाथ मारली. यात त्यांचा हात दुखावला आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आहुजी याला अटक केली आहे. सध्या पुणे शहर भागातील पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षकालाही मारहाण करण्यात आली होती. त्याला आठवडा उलटण्याची आतच दुसरी घटना समोर आली आहे.