घाट पास करण्यासाठी ट्रेलरचालकाकडून लाच घेणाऱ्या पीएसआयला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 10:28 AM2018-09-29T10:28:11+5:302018-09-29T10:33:09+5:30
पुणे मुंबई महामार्गावर घाट पास करुन देण्यासाठी ट्रेलरचालकाकडून ३२ हजार रुपयांची लाच घेताना पहाटे पावणेचार वाजता सापळा रचून महामार्ग सुरक्षा गस्ती पथकाच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
पुणे - पुणे मुंबई महामार्गावर घाट पास करुन देण्यासाठी ट्रेलरचालकाकडून ३२ हजार रुपयांची लाच घेताना पहाटे पावणेचार वाजता सापळा रचून महामार्ग सुरक्षा गस्ती पथकाच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. इतक्या पहाटे करण्यात आलेली ही देशातील पहिलीच कारवाई असावी.
भरत तानु तांबीटकर (वय ५७, रा. कुराल व्हिलेज, मालाड पूर्व) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुळचे ठाण्याचे असून त्यांचा ट्रक आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे़ त्यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांना फोन करुन खंडाळा घाट पास करुन देण्यासाठी ३२ हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचे सांगितले. त्यांच्या फोननंतर पुण्यातून दोन पथके तातडीने लोणावळ्याला रवाना करण्यात आली. या पथकाने येथून जाताना पंच आपल्याबरोबर घेतले होते.
मध्यरात्री दीडच्या सुमारास या पथकाने खंडाळा येथे तक्रारदारांची भेट घेतली. त्यानंतर तेथूनच त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यात भरत तांबीटकर यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खंडाळा आणि लोणावळा दरम्यान सापळा रचण्यात आला. पहाटे ३ वाजून भरत तांबीटकर हे तेथे पैसे घेण्यासाठी आले. तक्रारदाराकडून ३२ हजार रुपये लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुहास नाडगौंडा, पोलीस हवालदार करंदीकर, पोलीस शिपाई कृष्णा कुऱ्हे, किरण चिमटे यांनी या कारवाईत भाग घेतला. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे. खंडाळा घाटात अवजड ट्रेलर, टँकर, कंटेनर यांची वाहतूक सुरू असल्यास गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होऊन मोठ्या मोठ्या रांगा लागतात. त्यामुळे अशा अवजड ट्रेलर, कंटेनर यांना रात्रीच्या वेळी घाटातून जाण्यासाठी परवानगी दिली जाते.