तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना झाल्या सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 04:40 PM2018-02-03T16:40:45+5:302018-02-03T16:43:36+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना सक्रीय झाल्या आहेत.

political parties & labour union active for Tukaram Mundhe's transfer | तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना झाल्या सक्रीय

तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना झाल्या सक्रीय

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंढे यांच्या बदलीसाठी साकडे घालण्याचा प्रयत्न सुरूपदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे दोन्ही पालिकांतील पदाधिकाऱ्यांशी उडु लागले खटके

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना सक्रीय झाल्या आहेत. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेशिस्त कर्मचाऱ्यांवर सुरू केलेली कारवाई तसेच ‘पीएमपी’च्या कारभारातील ‘राजकीय’ हस्तक्षेप पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे मुंढे यांना हटविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. 
शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’ या स्वतंत्र कंपनीची निर्मिती झाल्यानंतर बससेवा सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, २००७ नंतर दरवर्षी पीएमपीच्या तोट्यात वाढच होत गेली. कोलमडलेली प्रशासकीय व्यवस्था, खिळखिळ्या बस, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी असे चित्र निर्माण झाले. तसेच वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे त्यात आणखीनच भर पडल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. अनेक अधिकारी आले अन् गेले पण ‘पीएमपी’च्या स्थितीत फरक पडला नाही. त्यासाठी मुंढे यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी ‘पीएमपी’त यावेत, यासाठी अनेकांनी आग्रही भूमिका घेतली. पण, मागील एप्रिल महिन्यापासून यातीलच काही जण आता मुंढेच्या कामाच्या पध्दतीवर फुली मारू लागले आहेत. पक्षांतील वरिष्ठ नेत्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंढे यांच्या बदलीसाठी साकडे घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे दोन्ही पालिकांतील पदाधिकाऱ्यांशी खटके उडु लागले. लोकप्रतिनिधींना सन्मानाने वागणूक देत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. सर्वसाधारण सभांमध्ये अनेक नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही मुंढे यांची कार्यशैली हिटलरप्रमाणे असल्याचे म्हटले होते. ‘पीएमपी’ होणारा राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे बंद करून मुंढे यांनी सत्ताधाऱ्यांसह सर्व राजकीय पक्षांना दुर ठेवले. त्यामुळेही अनेक पदाधिकारी मुंढे यांच्यावर नाराज असून त्यांच्या बदलीसाठी आग्रही आहेत. 
मागील दहा महिन्यात प्रशासनाची व्यवस्थित घडी बसविली आहे. मात्र, हे करताना त्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. यामध्ये काही पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर सुरू करण्यात आलेले तोट्यातील मार्ग, पास केंद्रही त्यांनी बंद केले. कर्मचारी संघटनांनाही त्यांनी अनधिकृत ठरविले. त्याचबरोबर पंचिग पास बंद करणे, तसेच पास दरांमध्ये बदल तसेच पीएमपीची स्थिती अद्याप सुधारत नसल्याचा दावा करीत प्रवासी संघटनाही नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह कर्मचारी संघटनांही आता मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागले आहेत. वरिष्ठ नेत्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: political parties & labour union active for Tukaram Mundhe's transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.