पापुद्य्रांतून साकारले भावविश्व

By admin | Published: December 30, 2014 12:12 AM2014-12-30T00:12:29+5:302014-12-30T00:12:29+5:30

साधारणपणे कोलाज म्हटले, की कागदाचे छोटे छोटे कपटे करून चित्र तयार करणे, विविध भाज्यांचा उपयोग करून वेगवेगळे प्राणी, त्यांचे चेहरे तयार करणे एवढेच डोळ्यांसमोर येते.

Poo | पापुद्य्रांतून साकारले भावविश्व

पापुद्य्रांतून साकारले भावविश्व

Next

पुणे : साधारणपणे कोलाज म्हटले, की कागदाचे छोटे छोटे कपटे करून चित्र तयार करणे, विविध भाज्यांचा उपयोग करून वेगवेगळे प्राणी, त्यांचे चेहरे तयार करणे एवढेच डोळ्यांसमोर येते. याशिवाय आत्ताच्या काळातील पिकासा किंवा स्मार्टफोन्समधील अ‍ॅप्सवरून तयार केलेले कोलाज आपल्याला ठाऊक असते. परंतु, कांदा आणि लसणाच्या पापुद्य्रांपासूनही तयार होऊ शकते, हे दाखवून दिले आहे संजय शिंदे यांच्या अनोख्या कलाकृतीतून.
या प्रत्येक चित्रात पापुद्य्रांच्या विविध छटांचा उपयोग करून साकारलेले व्यक्तीच्या, प्राण्यांच्या, देवदेवतांच्या डोळ्यांतील भाव हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे.
या कांदा-लसूण पापुुद्य्रांच्या कोलाज चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व येथील कलादालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शिल्पकार मुरली लाहोटी, उमेश गुप्ते, सुचित्रा कवठेकर, सुनीती माधव उपस्थित होते.
विविध प्रकारची फुलपाखरे, बैलांची झुंज, झाडाखाली रवंथ करत बसलेली गाय, पिल्लाला खाऊ घालणारे पक्षी, कुत्रा, मांजर, सिंह, उधळलेला घोडा, डरकाळी फोडणारा वाघ हे प्राणिविश्व आणि त्याबरोबरच नाचणारे, दैनंदिन काम करणारे आदिवासी, शेतात काम करत असलेल्या स्त्रिया, दोरीवरच्या उड्या मारणाऱ्या मुली, कोंबड्यांना दाणे टाकणारी बाई, स्पर्धेत धावणारे घोडे, हातगाडी ओढून नेणारा माणूस अशी विविध मानवचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. हे प्रदर्शन ३१ तारखेपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले आहे. (प्रतिनिधी)

टिपले सुंदर भाव
या प्रदर्शनात वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती, सरस्वती, महाभारतातील अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण, तसेच राधा-कृष्ण, गौतम बुद्ध, संत मीरा अशा देवदेवता, तसेच घोड्यावर स्वार असलेले शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, पं. भीमसेन जोशी, महात्मा गांधी, मुलांमध्ये रमलेले चाचा नेहरू, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे ही विविध व्यक्तिचित्रे व त्यांच्या डोळ्यांतील भाव अतिशय सुंदर साकारले आहेत.

आज अशा प्रकारचे धाडस कोणी करत नाही. परंतु, ही कलाकृती जतन करण्यासाठी स्वतंत्र कलादालनाची गरज आहे आणि ही चित्रे जागतिक पातळीवर पोहोचण्याची गरज आहे.
- विवेक खटावकर,
शिल्पकार

Web Title: Poo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.