पुणे : विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राचा अभ्यासक पूर्णपणे शिकवला गेला नाही. तर काही महाविद्यालयात घाईघाईने अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मात्र, येत्या ३० जानेवारीपासून सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे पहिली सत्र परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु,अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारीच झाली नसल्याने विद्यापीठाने काही दिवस परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) राज्यातील विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली. मात्र, प्रवेश प्रक्रियेला लांबल्यामुळे काही महाविद्यालयात ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वर्ग सुरू झाले तर व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होती. त्यामुळे अनेक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना केवळ ३० ते ४० दिवसच वर्गात शिक्षकांकडून मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी विधी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमाच्याविद्यार्थ्यांना ९० दिवस मार्गदर्शन केल्या शिवाय त्यांची परीक्षा घेता येत नाही,या नियमानुसार ९० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आमची परीक्षा घावी, अशी मागणी विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात १६ नाशिक जिल्ह्यात ५ तर अहमदनगर जिल्ह्यात ४ विधी महाविद्यालये आहेत. अर्धवट शिकवलेल्या अभ्यासक्रमासह सत्र परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड तणावात असून विद्यार्थ्यांना जेएमएफसी सारख्या प्रतिष्ठित परीक्षांची तयारी करायची आहे. अपूर्ण अभ्यासक्रमासह परीक्षेला सामोरे जाणे हा एक प्रकारे अन्यायच ठरेल. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा १५ ते २० दिवस पुढे ढकलावी, या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांतर्फे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांना दिले आहे.--सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व विधी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निश्चित केलेल्या कालावधीत योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमास नांदेड, बीड, उस्मानाबाद यांसारख्या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.उशीरा मिळालेला प्रवेश, महाविद्यालयातील बुडालेला अभ्यासक्रम आणि चालू अभ्यासक्रम यांची सांगड घालताना विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने १५ ते २० दिवस परीक्षा पुढे ढकलावी या मागणीचे निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे.- करण नाईकनवरे, विद्यार्थी, आयएलएस लॉ कॉलेज.........विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला दिलेले निवेदन अद्याप माझ्यापर्यंत आले नाही. नियमानुसार विद्यार्थ्यांना ९० दिवसांचा कार्यकाल मिळणे गरजेचे आहे. तसे झाले नसले तर परीक्षेच्या कालावधीत दुरूस्ती करता येईल.- डॉ. अरविंद शाळिग्राम, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा पुढे ढकला : विद्यार्थ्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 8:44 PM
अहमदनगर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी विधी अभ्यासक्रमास घेतला प्रवेश
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला निवेदनकाही महाविद्यालयात घाईघाईने पूर्ण केला अभ्यासक्रम येत्या ३० जानेवारीपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पहिली सत्र परीक्षा घेतली जाणार