गेल्या 70 वर्षात गरिबी गेली नाही, आता काय घालवणार ; साेशल मीडियावर पुणेकरांची मतमतांतरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 11:45 AM2019-03-26T11:45:08+5:302019-03-26T11:46:29+5:30
राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदींनी 2014 च्या निवडणुकीच्या प्रचारात सत्तेत आल्यास प्रत्येकाच्या खातात 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले हाेते. गेल्या पाच वर्षांमध्ये काेणाच्याच खात्यात 15 लाख जमा न झाल्याने माेदींना त्यांच्या घाेषणेवरुन वेळाेवेळी घेरण्यात आले. आता राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. यातून गरिबी हटावचा नारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी साेशल मिडीयावर ट्राेल केले जात आहेत. यात पुणेकर आघाडीवर असून गेल्या 70 वर्षात गरिबी घालवू शकला नाहीत तर आता काय घालवणार असा प्रश्न विचारला जात आहे.
काँग्रेसनं पुन्हा एकदा 'गरिबी हटाव'चा नारा दिला आहे. दुपारी राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तेस आल्यास गरिब कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ श्रीमंत उद्योगपतींना मदत करतात. मात्र आम्ही गरिबांना मदत करणार आहोत, असेही ते पत्रकार परिषदेत म्हंटले. काँग्रेसचं सरकार आल्यावर गरिबांना न्याय मिळेल, असंही ते म्हणाले.
यावर राहुल गांधी आता साेशल मीडियावर चांगलेच ट्राेल हाेत आहेत. गेल्या 70 वर्षात काॅंग्रेस गरिबी घालवू शकली नाही आणि आता निवडणुकींच्या ताेंडावर अशी विधाने करणे बराेबर नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे हे 75 हजार नागरिकांच्या करातूनच दिले जाणार आहेत. म्हणजे नागरिकांना लुबाडण्याचा हा प्रकार असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. गरिबांना पैसे नकाे तर त्यांच्या हाताला काम द्या असा सूर देखील उमटताना दिसत आहे. 70 वर्षात गरिबी हटली नाही आता हे मान्य करा आणि लाेकांच्या हाताला काम द्या अशी मागणी केली जात आहे.
साेशल मिडीयावर राहुल गांधींच्या बातमीवर उमटलेल्या प्रतिक्रीया
- गडबड करू नका. आधी मोदींनी दिलेले 15 लाख तरी संपू द्या, मग तुमचे घेऊ !
- अशाने लोक तुझ्यासारखेच रिकामटेकड होतील ,काम करण्याच सोडून देतील.
- गरीबाला फुकट काही देऊ नका त्याच्या हाताला रोजगार द्या ,
- सरकार कोणतेही असो या फुकट च्या योजना सगळ्या बंद करा या मुळे तरुण पिढी व्यसनाधीन आणि आळशी बनत आहे.
- 1971 मध्ये इंदीराजी गांधी ने गरीबी हटाव चा नारा दिला होता.परंतु आज पर्यंत गरीबी हटली नाही।निवडणुकीत मतदानासाठी ही फसवी घोषणा केली आहे. जनता यात फसणार नाही.
- आधी इतके वर्ष सत्ता भोगली तेव्हा तुम्ही लोकांच्या गरजा पूर्ण नाही केल्या आता परत सत्ता मिळविण्यासाठी लोकांना मुर्ख बनवत आहेत.
- गरीबी हटाव मोहिम 60 वर्षा पासून सुरु आहे आणि आज पुन्हा हाच मुद्धा घेऊन तुम्ही इलेक्शन मध्ये यायले लाजा वाटतात का काँग्रेस ल. चार पिढ्या तुमच्या हाच मुद्दा जनता काय येडी नाही आत्ता.
- 70 वर्षात गरिबी हटली नाही, हे तर मान्य करा आता. गरिबांना हाताला कामं द्या त्यालाही तुमच्या घोषणांचा वीट आला आहे.