पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भाविकांची रीघ

By admin | Published: January 3, 2015 11:02 PM2015-01-03T23:02:20+5:302015-01-03T23:02:20+5:30

उद्यापासून सुरू होणाऱ्या पौष पौर्णिमेसाठी भाविकांची जेजुरीत गर्दी वाढू लागली आहे.

Prajnimitra | पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भाविकांची रीघ

पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भाविकांची रीघ

Next

जेजुरी : उद्यापासून सुरू होणाऱ्या पौष पौर्णिमेसाठी भाविकांची जेजुरीत गर्दी वाढू लागली आहे. अठरापगड जाती जमातींची ही यात्रा असल्याने समाजबांधव आपापल्या कुटुंब कबिल्यासह जेजुरीत येऊ लागले आहेत. यात्रेत पारंपरिक असा सुप्रसिद्ध गाढवांचा बाजार भरत असल्याने त्यांचेही आगमन होऊ लागले आहे. यात गावठी, तसेच गुजरात काठेवाड येथून जनावरे ही आलेली आहेत.
दर वर्षी पौष पौर्णिमेला अठरापगड जाती-जमातींची जेजुरीत मोठी यात्रा भरते. वैदू, कोल्हाटी, बेलदार, कैकाडी, कुंभार, डोंबारी, परीट, पाथरवट, गारुडी, आदी भटक्या जातीजमातींचे लोक यात्रेनिमित्त जेजुरीत येत आहेत.
या भटक्या विमुक्तांचे पारंपरिक उदरनिवार्हाचे साधन म्हणजे गाढव. भाविक जेजुरीस येताना याच साधनाचा वाहक म्हणून वापर करीत जेजुरीत येत असल्याने गाढवांची संख्याही मोठी असते. यातूनच गाढवांची खरेदी-विक्री होऊ लागली. पुढे पुढे त्याला बाजाराचे स्वरूप आले. यामुळेच पौष पौर्णिमेला भटक्याविमुक्तांच्या यात्रेबरोबरच गाढवांचा बाजार प्रसिद्ध झाला आहे. उद्यापासून यात्रेला व बाजाराला ही सुरुवात होईल.
यात्रेनिमित्त वैदू समाजाची भरणारी जातपंचायत वादग्रस्त ठरत असल्याने येथे ही पंचायत भरण्याबाबत उद्याच पंच येथे आल्यानंतर समजणार आहे. मात्र,
तशी शक्यता कमीच असल्याचे भविकाकडून सांगण्यात येत
आहे. यात्रेनिमित्त जेजुरीत
येणाऱ्या भाविकांच्या स्वागताला जेजुरीनगरीत जय्यत तयारी करण्यात येत आहेत. (वार्ताहर)

४उद्या रविवारी सकाळी ९.२२ वाजता पौर्णिमा सुरू होत आहे. सोमवारी सकाळी १०.२२ वाजता ती संपणार असल्याने रविवारीच पौर्णिमेची यात्रा भरणार आहे. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक जेजुरीत दाखल होत आहेत. यात्रेला येणारे भाविक जेजुरीत दोन ते तीन दिवस मुक्कामी असतात. त्यांच्या सुविधेसाठी जेजुरी नगरपालिका आणि मार्तंड देव संस्थांनाकडून भाविकांना जागेच्या स्वछतेबरोबरच पिण्याच्या पाणी, वीज इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

४येथील बंगाली पटांगणावर दर वर्षी गाढवांचा बाजार भरत असतो, त्याच बरोबर वैदूंची जातपंचायत आणि कुस्त्यांचा आखाडाही भरत असतो.
४भातू कोल्हाटी समाजाचीही जातपंचायत भरत असते. या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय उभे राहत असल्याने या बाजारालाही जागा कमी पडू लागली आहे. बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या भाविकांकडून होत आहे.
४काठेवाडी जनावराला प्रचंड मागणी असते; मात्र सौराष्ट्र येथून दूरवरून मजल दरमजल करीत येथे येण्याबाबत व्यापारीवर्गात उत्साह राहिलेला नसल्याने ही संख्या दर वर्षी कमी कमी होत आहे.
४बाजारात गावठी गाढवांना ८ ते १० हजारांपर्यंत, तर काठेवाडी जानवराला १० हजारांवरून २५ ते ३० हजारांपर्यंत बाजारभाव मिळेल, अशी व्यापाऱ्यांची अटकळ आहे.

४येथे भरणारा गाढवांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. गाढवांच्या बाजारात या वर्षी काठेवाडी गाढवांची संख्या कमी असून, केवळ १२५ जनावरे विक्रीसाठी आलेली आहेत. तर, ५०० गावठी जनावरे विक्रीसाठी आलेली आहेत. यांत्रिक युगामुळे जनावरांची संख्या कमी होऊ लागली असल्याचे गुजरात येथून आलेले व्यापारी बाबुद्दीन भाई गधेवाले आणि पुण्यावरून आलेले पिंटू धोत्रे, तर कोकणातून आलेले आनंद मोहिते यांनी सांगितले.

Web Title: Prajnimitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.