बारामती : बारामती शहराच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना सादर करण्यात आला. मागील आठवड्यापासून विकास आराखडा सादर होणार, अशी चर्चा होती. या विकास आराखड्यात नगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने टाकण्यात आलेल्या आरक्षणांची उत्सुकता नागरिकांना आहे. आॅक्टोबर २०१२ मध्ये बारामती नगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली. पालिकेचे क्षेत्रफळ पाच पट वाढले आहे. याच अनुषंगाने नगररचना विभागामार्फत पालिकेच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा करण्यात आला आहे. दोन वर्षांपासून विकास आराखड्याचे काम सुरू होते. मागील आठवड्यातच विकास आराखडा सादर होणार, अशी चर्चा होती. मात्र, तब्बल एका आठवड्यानंतर आज सकाळी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांना बंद लिफाफ्यात विकास आराखडा नगररचनाकार दत्तात्रय काळे यांनी सादर केला. उपनगराध्यक्षा रेश्मा शिंदे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, नगरसेवक श्याम इंगळे, संजय लालबिगे यांच्यासह नगररचना खात्याचे अधिकारी उपस्थित होते. बारामती ग्रामीण, रुई, जळोची, तांदूळवाडी या शहरालगतच्या गावांचा बारामती नगरपालिकेत समावेश झाला. त्याअनुषंगाने शाळा, खेळाचे मैदान, भाजी मंडई, दवाखाने, उद्याने आदींसाठी विकास आराखड्यात आरक्षणे टाकण्यात आलेली आहेत. या भागातील मिळकतधारकांमध्ये विकास आराखड्याबाबत उत्सुकता आहेत. विशेषत: जळोची भागात जागांचे दर तीन वर्षांपूर्वी गगनाला भिडले होते. अन्य भागांतदेखील तीच स्थिती होती. आता कोणाच्या भूखंडावर आरक्षणे पडली आहेत, याची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
बारामती नगरपालिकेचा वाढीव हद्दीचा विकास आराखडा सादर
By admin | Published: December 01, 2015 3:33 AM