पुणे : शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाचे अध्यक्षासह तिघांना अडीच लाख रुपयांची लाख घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau, Maharashtra) अटक केली. चंदननगर येथील अध्यक्षांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी पैसे घेताना त्यांना सापळा लावून पकडण्यात आले. अध्यक्ष मंगल शिवाजीराव भुजबळ (वय ६३), त्यांचे पती शिवाजीराव बाळासाहेब भुजबळ (वय ६२) आणि लिपिक संदीप रंगनाथ गायकवाड (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी एका शिपायांच्या मुलाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार तरुणाचे वडील हे तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात शिपाई पदावर नोकरीला आहेत. त्यांची तब्येत बरी नसल्याच्या कारणावरुन त्यांना नोकरीवरुन काढून टाकले होते. गेली अनेक वर्षे त्यांनी येथे नाेकरी केली आहे. केवळ सेवानिवृत्तीला ३ वर्षे उरले होते. त्यांनी ससून रुग्णालयातून फिटनेस सर्टिफिकेटही दिले होते. तरीही त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात येणार होते. त्यांना नोकरीवरुन काढून न टाकण्यासाठी व भविष्यात सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची बुधवारी पडताळणी करताना तडजोडीअंती त्यांनी अडीच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षाच्या पुण्यातील निवासस्थानी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून अडीच लाख रुपये स्वीकारताना तिघांना अटक करण्यात आली. त्यांना विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक तपास करीत आहेत.