पुण्यातील गुन्हेगारी रोखा, आता भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 09:35 PM2023-06-28T21:35:26+5:302023-06-28T21:38:24+5:30
भाजपच्या शिष्टमंडळानेच पोलीस आयुक्तांची भेट घेत, पुण्यातील गुन्हेगारीकडे लक्ष वेधले आहे.
पुणे - शहरातील तरुणीवर सदाशिव पेठेत दिवसाढवळ्या गजबजलेल्या ठिकाणी कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने महाराष्ट्र हादरला आहे. रायगडाच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच हा गुन्हा घडल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्न विचारले जात आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या घटनेनंतर राज्याच्या गृहमंत्र्यांना सवाल केला आहे. आता, भाजपच्या शिष्टमंडळानेच पोलीस आयुक्तांची भेट घेत, पुण्यातील गुन्हेगारीकडे लक्ष वेधले आहे.
पुणे शहरातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या कोयत्या हल्ल्याच्या आणि इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या शिष्टमंडळासह पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी, गुन्हेगारी रोखण्यासाठी कृती आराखडा करण्याची मागणीही या भाजप नेत्यांनी केली. याशिवाय पुणे पोलीस आयुक्त हद्दीत प्रस्तावित नव्या सात पोलीस स्टेशनच्या निर्मितीबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णयही या भेटीदरम्यान झाल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दरम्यान, यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, अजय खेडेकर, दीपक नागपुरे, अमोल कविटकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, संदीप लोणकर, बापू मानकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
तरुणींवरील हल्ल्यांसंदर्भात पोलीस आयुक्तांची भेट !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 28, 2023
पुणे शहरात सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या कोयत्या हल्ल्याच्या आणि इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळासह भेट घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी कृती आराखडा करण्याची मागणी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली… pic.twitter.com/g3t0sOThYT
गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसावा यासाठी कडक कलमे लावून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल, या दृष्टीने पोलिसांनी खटला न्यायालयीन पातळीवर मांडावा. या मागणीसह कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संकुलात तक्रार पेटी बसविणे, दुचाकीवरील मार्शलची संख्या वाढवून गस्त वाढविणे, गरज पडल्यास गणेश मंडळ कार्यकर्त्यांना सामावून घेणे, बंद असलेल्या पोलीस चौकी पुन्हा सुरु करणे आदी मागण्याही यावेळी करण्यात केल्या.
पोलिसांनी आरोपींवर वचक ठेऊन कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी कार्यपद्धती ठेऊन कार्यरत राहणे आवश्यक आहे. याशिवाय गस्तीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करणे ही गरज असून त्यासाठी गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं.