वीज कोसळू नये म्हणून ८०० गावांत बसवणार अटकाव यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:08+5:302021-07-16T04:09:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : दर वर्षी माॅन्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे ...

Prevention system to be installed in 800 villages to prevent power outages | वीज कोसळू नये म्हणून ८०० गावांत बसवणार अटकाव यंत्रणा

वीज कोसळू नये म्हणून ८०० गावांत बसवणार अटकाव यंत्रणा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : दर वर्षी माॅन्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यू झाला. तर काही ठिकाणी मोठी वित्तहानीदेखील झाली आहे. या पार्श्वभूमीवरच पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वीज अटकाव यंत्रणेच्या पायलट प्रोजेक्टमध्ये चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

वीज पडणे ही नैसर्गिक घटना असली तरी दर वर्षी यामुळे मुनष्य, पशु आणि वित्त हानी होत असते. एका सर्वेक्षणानुसार देशात दरवर्षी सुमारे २५०० व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो. त्यामुळे वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे जेणेकरून मनुष्य, पशु आणि वित्त हानीचे प्रमाण कमी करता येईल. ग्रामीण भागात वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे. माॅन्सून सक्रिय होण्याच्या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्या काळात विजा कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. गडगडाटी वादळासह विजा चमकतात कुठेतरी कोस‌ळतात. याच कालावधीत शिवारात मशागतीची तयारी सुरू असते. त्यावेळी शेतात कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना नियमित घडत असतात. वीज कोसळण्याने होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने सर्वाधिक धोका असलेल्या गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यात एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

------

--------

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी (आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना)

- विद्युत उपकरणे उदाहरणार्थ हेअर ड्रायर, विद्युत टुथब्रश किंवा विद्युत रेझर, जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.

- वादळात टेलिफोनचा वापर टाळा, वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधून वाहू शकते.

- बाहेर असताना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा.

- अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.

- जर तुम्हाला विद्युतभारीत वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

-------

८०० गावांत यंत्रणा बसविणे सुरू

राज्य शासनाने यंदा प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात वीज पडण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या गावात वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, याबाबत काम सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

Web Title: Prevention system to be installed in 800 villages to prevent power outages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.