रांजणगाव सांडस: शिरूरच्या पूर्व भागात साखर कारखाने असल्याने गुऱ्हाळघरांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, या गुऱ्हाळघरांना लॉकडाऊनचा फटका बसल्याने त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झालेला आहे. लॉकडाऊन संपला असला, तरी गुऱ्हाळघरातील कामगार परतले नाहीत. त्यामुळे आपोआपच उसाची मागणीही कमी झाली. गतवर्षी मिळणाऱ्या तीन हजार ते तीन हजार २०० च्या तलुनेत यंदा या उसाला दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० दर मिळत आहे. सध्या अनलॉक झाले असले तरी उसाला मात्र, भाव कमीच मिळत आहे.
गतवर्षी पडलेल्या पावसामुळे भीमा नदीकाठावरील गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाण ऊस पीक घेतले. दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे गुऱ्हाळघरांमध्ये कामाला असणारे परप्रांतीय कामगार तसेच ऊसतोड मजूर आपापल्या गावी निघून गेले. त्यामुळे गुऱ्हाळघर मालकांसह शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर साखर हंगाम सुरु झाला अन् आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा शेतकऱ्यांना मार्ग मिळाला. कारखाने सुरु झाल्याने ऊस कारखान्यास घालण्याची लगबग सुुरु झाली पण मजुरांची कमतरता हे संकट उभे राहिले. अनेक शेतकऱ्यांचा यावर्षी कमी ऊस कारखान्यांना गेला. तसेच पावसाचाही फटका सहन करावा लागला होता.
गुऱ्हाळघरांचीही तीच अवस्था पहायला मिळत आहे. गुऱ्हाळघरांमध्ये परप्रांतीय कामगार असतात. लॉकडाऊनमुळे हे सर्व जण आपल्या गावी गेले आहेत. अपवाद वगळता अनेक जण अजूनपर्यंत ते परतले नाहीत. त्यामुळे यावर्षी गुऱ्हाळघरे उशिरा सुरु झाली. उरला प्रश्न तो गूळ उत्पादनाचा. कामगारच नसल्याने गुऱ्हाळघर मालकही उत्पादनास सुरुवात करायची की नाही, या व्दिधा मन:स्थितीत आहेत. अनलॉकनंतर परिस्थिती बदलेल असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही.
गुऱ्हाळघरांसाठी लागणाऱ्या उसाचाही प्रश्न निर्माण झाला. ज्या ठिकाणी गुऱ्हाळघर सुरु आहे त्या ठिकाणी शेतकरी ऊस देत आहेत. पण अपेक्षित असा भाव मिळत नाही. गतवर्षी या उसाला तीन हजार ते तीन हजार २०० रुपये दर मिळाला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये हाच दर दोन हजार ते दोन हजार ३०० पर्यंत गेला. मात्र, अनलॉकनंतर ही परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. पण आता हा ऊस दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० रुपये दराने घेतला जात आहे. त्यामुळे उसाला भाव तलुनेत कमीच मिळत नाही.
गुऱ्हाळघरांना लागणाऱ्या उसाला गेल्या वर्षी तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे अपेक्षित असा दर मिळत नाही. गुऱ्हाळघरांचे कामगार गावाकडून न परतल्याने अनेक गुऱ्हाळघरे बंद आहे तर ज्या ठिकाणी सुरु आहे त्या ठिकाणी उसाला अडीज हजारापर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे दर कधी वाढणार या अपेक्षा शेतकरी करत आहे.
२२ रांजणगाव सांडस ऊस