पुणे : एलजीबीटी कम्युनिटीकडून पुण्यात आज प्राईड रॅली काढण्यात आली. पुण्यातील संभाजी बागेपासून या रॅलीला सुरुवात झाली. डेक्कनला वळसा घालून पुन्हा ही रॅली संभाजी पार्क येथे समाप्त झाली. या रॅलीत शेकडाे लाेक सहभागी झाले हाेते. यावेळी प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं अशा घाेषणा देण्यात आल्या. तसेच सप्तरंगी माेठा ध्वज देखील यावेळी हातात धरण्यात आला हाेता. इंद्रधनु संस्थेकडून ही रॅली काढण्यात आली हाेती.
आज सकाळी 10.30 वाजता ही प्राईड रॅली काढण्यात आली. समाजाचा एलजीबीटी कम्युनिटीकडे बघण्याचा दृष्टिकाेन बदलावा, त्यांना समानतेची वागणूक मिळावी. एलजीबीटी कम्युनिटीचा समाजाने तिरस्कार करु नये या हेतूने ही रॅली काढण्यात आली हाेती. या रॅलीत एलजीबीटी कम्युनिटीच्या लाेकांबराेबरच अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले हाेते. रॅलीमध्ये विविध घाेषणा लिहीलेले फलक हातात धरण्यात आले हाेते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध कंपन्यांमधील तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणी सहभागी झाले हाेते.
रॅलीचे संभाजी पार्क येथे ढाेल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी लाेकांनी ढाेल तांशांवर ताल धरला. या रॅलीत अनेक परदेशी नागरिक देखील सहभागी झाले हाेते. या रॅलीत सहभागी झालेले भारतातील पहिले गे कपल असलेले समीर समुद्र आणि अमित गाेखले म्हणाले, 377 रद्द झालं असलं तरी म्हणावे तितके समान हक्क एलजीबीटी कम्युनिटीला मिळालेले नाहीत. लाेकांमध्ये अजूनही या कम्युनिटीबद्दल चुकीचे समज आहेत. एलजीबीटी सुद्धा या समाजाचा एक भाग आहे. त्यांना देखील समान हक्क आहेत. हे सांगण्यासाठी ही रॅली काढण्यात आली हाेती.