पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात याेग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. गेल्या पाच वर्षांपासून जागतिक याेग दिन कारागृहात साजरा केला जाताे. यंदा या कार्यक्रमाला कारागृह व सुधारसेवाचे अपर पाेलीस महासंचालक व महानिरीक्षक सुनिल रामानंद, विशेष पाेलीस महानिरीक्षक डाॅ. विठ्ठल जाधव, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार आदी उपस्थित हाेते.
रागाच्या भरात एखादा गुन्हा घडताे आणि नंतरचे आयुष्य कारागृहात घालवावे लागते. अनेकदा कारागृहात शिक्षा भाेगत असणारे अनेक गुन्हेगारांच्या हातून रागाच्या भरात गुन्हा घडलेला असताे. त्याची शिक्षा त्यांना भाेगावी लागत असते. अशा गुन्हेगारांच्या पुनर्वसनाचं काम कारागृहाकडून करण्यात येत असतं. तसेच कारागृहात शिक्षा भाेगत असलेले कैदी हे जरी गुन्हेगार असले तरी त्यांच्या सुद्धा आराेग्याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांपासून येरवडा कारागृहात याेग दिन माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. यंदा या उपक्रमात 700 कैद्यांनी सहभाग घेतला.
सुर्या फाऊंडेशनचे याेग प्रशिक्षक विश्वास पानसरे व श्रीवंत नंदनवर यांनी कैद्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुनिल रामानंद यांनी स्वतः कैद्यांच्या समाेर याेग प्रात्याक्षिके केली. तसेच कैद्यांना नियमित याेगा करण्यासाठी प्रेरित केले. याेगसाधना ही केवळ एक दिवसाकरीता नसून दरराेज व नियमित करणे आवश्यक आहे. याेगसाधन करुन आपले शारीरिक व मानसिक आराेग्य जपयला हवे असे मार्गदर्शन देखील रामानंद यांनी कैद्यांना केले.
या कार्यक्रमासाठी उपअधिक्षक सी. ए. इंदुरकर, प्रशासन अधिकारी सत्यवान हिंगमिरे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी एन. एस क्षिरसागर, अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी डी. एच. खरात, तुरंगाधिकारी संजय मयेकर आदी उपस्थित हाेते.