पुणे महानगरपालिका परिसरातील स्पर्धा परीक्षांचे खासगी क्लास सुरू करण्यास पालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे लसीकरण बंधनकारक केले आहे. पूर्ण महाराष्ट्रात व पुण्यात लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे सध्या सर्वांना लस उपलब्ध होत नाही, अशा परिस्थितीत लसीकरण झाल्याशिवाय खासगी क्लासमध्ये उपस्थित राहता येणार नाही, अशी अट घालणे सयुक्तिक आहे का याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
यावर पालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे काही क्लासचालकांकडून सांगितले जात आहे. मात्र, इयत्ता दहावी-बारावी किंवा नीट, जेईई, सीईटी आदी प्रवेश पूर्वपरीक्षा यांचे क्लास केव्हा सुरू करणार? असा प्रश्न इतर क्लासेस चालकांकडून विचारला जात आहे.
------
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने लसीकरणाबाबत घातलेले बंधन योग्य आहे. लस न घेता विद्यार्थी क्लासमध्ये आले आणि एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झालेला असेल तर इतर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. तसेच लसीकरणाचे बंधन घातल्यामुळे अद्याप लसीकरणाबाबत गांभीर्य नसणारे तरुण लस घेण्यास प्रवृत्त होतील. त्यामुळे पालिकेने घेतलेला निर्णय योग्यच आहे.
- नागेश गव्हाणे, मुख्य व्यवस्थापक, स्पर्धा परीक्षा क्लास
चौकट
“शालेय विद्यार्थ्यांसाठी लस उपलब्ध नाही. संपूर्ण राज्यात लसीचा तुटवडा आहे. राज्य शासनाने प्रथमतः शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. पालिका प्रशासनाने खासगी क्लास सुरू करण्यास परवानगी देऊन लसीची अट शिथिल करण्याचा विचार करावा.”
- बंडोपंत भुयार, अध्यक्ष, कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ॲण्ड सोशल फोरम, महाराष्ट्र राज्य