नेहमीइतकेच पाणी मिळूनही अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 03:05 AM2018-10-28T03:05:26+5:302018-10-28T03:06:49+5:30
शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.
पुणे : पाटबंधारे खात्याने १ हजार १५० एमएलडी दररोज, असा इशारा दिला असला तरी सध्याही महापालिका खडकवासला धरणातून रोज त्यापेक्षा जास्त म्हणजे १२७० एमएलडी पाणी उचलत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात पाणी टंचाई निर्माण होत असेल तर दिवाळीनंतर प्रत्यक्ष १ हजार १५० एमएलडी पाणी रोज मिळू लागले तर काय असा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागला आहे.
खडकवासला धरणातून १० नोव्हेंबर २०१८ पर्यंत महापालिका रोज १ हजार ५७४ एमएलडी पाणी घेत होती. त्यानंतर ११ नोव्हेंबरपासून आजपर्यंत दररोज १ हजार २७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. तरीही पाणी कमी पडत आहे. पाटबंधारे खात्याने महापालिकेला दिवाळीनंतर १ हजार १५० एमएलडीच पाणी मिळेल, असे लेखी कळवले तर आहेच. शिवाय त्यापेक्षा जास्त पाणी उचलले तर पुन्हा पंप बंदची कारवाई करण्याची तंबीही दिली आहे. त्यामुळेच महापालिकेने पाणी नियोजनाच्या नावाखाली आताच कपात सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.
पाण्याचे वितरण कागदोपत्री बरोबर असले तरीही पाणी टंचाई होते याची अनेक कारणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातून सांगितली जातात. शहरातंर्गत असलेली सर्व वितरण व्यवस्था जुनी झाली आहे. सलग पाणी सोडले गेले तर फारशी अडचण होत नाही, मात्र पाणी सोडणे थांबवले तर पाईपलाईन रिकामी होते. त्यात हवा भरली जाते. त्यानंतर पाणी सोडले की पाईप फुटतात. दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा सर्व यंत्रणा नीट होऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागतो, असे पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार
पुण्याची अधिकृत लोकसंख्या, उद्योग तसेच ग्रामपंचायती यांना द्यावे लागणारे पाणी, अशी सर्व सांख्यिकी माहिती सादर करून मुख्यमंत्र्यांकडे पाण्याचा कोटा वाढवून मागणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे.
मात्र, महापालिकेने काही वर्षांपूर्वीच असा प्रस्ताव दिलेला असून त्याकडे सरकारी स्तरावर पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.