एकाच दिवसात १२,३५० क्विंटल साखरेचे उत्पादन, कर्मयोगी साखर कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:21 AM2018-01-31T02:21:09+5:302018-01-31T02:21:29+5:30
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला.
इंदापूर : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला.
अत्यंत अडचणीच्या काळात सर्व सभासद, ऊस वाहतूकदारांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी एकजुटीने केलेली जीवतोड मेहनत यामुळे हे शक्य झाले, अशा शब्दांत कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
या वेळी संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, की मागील सलग दोन गाळप हंगामामध्ये कारखान्याच्या क्षमतेपेक्षा कमी गाळप झाले. जवळपासच्या कारखान्यांनी उसाची पळवापळवी केली. संपूर्ण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. ऊस उत्पादकांना कॅनॉलचे पाणी मिळाले नाही. वीजकपातीचे संकट निर्माण झाले. उजनीची पाणीपातळी मागील उन्हाळ््यामध्ये कमालीची खालावली होती. अशा बिकट परिस्थितीमध्ये कर्मयोगी सहकारीच्या सभासदांनी उसाचे पीक जोपासले.
कारखान्याने कमीत कमी क्षेत्रात व खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी कारखानास्थळावर अत्याधुनिक माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा उभी केली आहे. दर्जेदार जैविक खते, सेंद्रिय खते व गांडुळखताची निर्मिती व विक्री सुरू केली आहे. त्यास सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऊसपिकाबाबत सभासदांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी शेतीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी ऊसपिक परिसंवादाचे आयोजन केले जाते, असे त्यांनी सांगितले. या वेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, रमेश जाधव, यशवंत वाघ, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र चोरमले, भास्कर गुरगुडे, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, मानसिंग जगताप, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, विष्णू मोरे, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, वसंत मोहोळकर, पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले, संचालिका जयश्री नलवडे, कार्यकारी संचालक बी. जी. सुतार, वर्क्स मॅनेजर एम. पी. निकम, चीफ केमिस्ट यू. के. कांदे, मुख्य शेतकी अधिकारी जे. एस. शिंदे, इंजिनिअर कळसाईत, चीफ अकौंटंट एल. बी. जाधव, डिस्टिलरी इन्चार्ज पी. डी. पाटील व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.