प्लॅस्टिक बाटल्यांच्या पुनर्वापरासाठी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:26 AM2018-03-28T02:26:58+5:302018-03-28T02:26:58+5:30
महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गोळा होणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे
पुणे : महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गोळा होणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील प्लॅस्टिकची समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
शहरामध्ये दररोज तब्बल १६०० ते १७०० टन कचरा गोळा होतो. यात प्लॅस्टिक बाटल्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात गोळा होतो. यामध्ये दररोज तब्बल १० टनांपेक्षा अधिक प्लॅस्टिक बाटल्या वापरून फेकल्या जातात. या बाटल्यांमुळे प्लॅस्टिकच्या समस्येत भर पडत आहे. त्याचबरोबर अशा बाटल्यांमध्ये नियमित पाणी भरून पॅकिंग करून त्या विकल्या जातात, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. त्यावर उपाययोजना म्हणून आर्टस अलाईव्ह फाउंडेशन या संस्थेने प्लॅस्टिक बाटल्यांच्या पुनर्वापराचा प्रकल्प हाती घेतला आहे. सद्यस्थितीला कोरेगाव पार्क आणि औंध या ठिकाणी दररोज १० हजार बाटल्यांची प्रकिया केली जात आहे. आता संपूर्ण शहरात ५० ठिकाणी बाटल्या गोळा करण्यासाठी यंत्रणा राबविली आहे. त्यानुसार प्रामुख्याने बाजार पेठा, रेल्वे स्टेशन, संस्था तसेच धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी संकलित होणाºया बाटल्या गोळा करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.