---
रांजणगाव गणपती : गावातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून विकेल ते पिकेल प्रकल्प, स्मार्ट प्रकल्प, कृषी प्रक्रिया प्रकल्पातील अनुदानाचा लाभ घेऊन स्वयंरोजगार निर्मितीस चालना देऊन आर्थिक उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले.
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील सेंद्रिय शेती प्रकल्पांस भेट दिली त्यावेळी ढगे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी शिरूर तालुका कृषी अधिकारी शिरीष भारती, मंडळ कृषी अधिकारी धनंजय हिरवे, कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर,कृषी मित्र राजेंद्र विधाटे ,प्रगतशिल शेतकरी दिपक भागवत, शिवाजी भागवत, पोपट गवते व इतर शेतकरी उपस्थित होते.
यावेळी प्रत्यक्ष शेतावर जाऊन महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्गदर्शना खाली विना अनुदान तत्त्वावर राबविण्यात आलेल्या सेंद्रिय शेती विकास प्रकल्पातील हरभरा पिक, कांदा बिजोत्पादन , सेंद्रिय कांदा पिक ,चारा पिकांचे व्यवस्थापन, मुक्त संचार गोठा व्यवस्थापन, गांडुळ खत प्रकल्प,जिवामृत , वेस्ट डिकंपोझरचे पिक उत्पादनातील महत्त्व , सेंद्रिय पिक उत्पादन व विक्री बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मका पिकांवरील लष्करी अळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जैविक कीटकनाशके, निमतेल, फेरोमेन सापळ्यांचा अवलंब करून लष्करी अळीचे नियंत्रण करावे तसेच विषमुक्त चारानिर्मितीवर भर देऊन दुग्ध उत्पादन करावे व दुग्धव्यवसायात वाढ करावी, याबाबत मेघराज वाळुंजकर यांनी माहिती दिली.
कृषिमित्र व होतकरू तरुण शेतकरी राजेंद्र विधाटे यांनी राबविलेल्या कृषि प्रकल्पातील डाळ मिल प्रकल्प, मसाला प्रक्रिया युनिट, बेसनपीठ उत्पादन युनिट, शेवई उत्पादन युनिटची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
--
फोटो : ०४ निमगाव म्हाळुंगी कृषी
फोटो ओळी : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे सेंद्रिय शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसाय पाहणी करताना कृषी अधिकारी.