कन्नड साहित्य-संस्कृती संवर्धनाला मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:47+5:302021-07-07T04:11:47+5:30
- कन्नड साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे उद्घाटन : मालती कलमाडी अध्यक्षपदी पुणे : पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आता कन्नड ...
- कन्नड साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे उद्घाटन : मालती कलमाडी अध्यक्षपदी
पुणे : पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आता कन्नड साहित्य, संस्कृतीशी संबंधित कार्यक्रमांची मेजवानी मिळू शकणार आहे. कन्नड भाषेच्या प्रचार व प्रसारालादेखील चालना मिळू शकेल. कन्नड साहित्य परिषदेची शाखा आता पुणे शहरात सुरू केली आहे. पुण्यातील कन्नड संघाच्या मानद सचिव मालती कलमाडी या पुणे जिल्हा घटक शाखेच्या अध्यक्षा म्हणून काम पाहतील.
कन्नड भाषा व साहित्याला प्रोत्साहन मिळावे, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने १९१५ साली बंगळुरू येथे स्थापन झालेल्या कन्नड साहित्य परिषदेची शाखा पुण्यात सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मनू बळीगार, महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष बसवराज मसुती यांच्या उपस्थितीत पुणे शाखेचे उद्घाटन केले.
पुण्यातील कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, मानद सचिव मालती कलमाडी, उपाध्यक्षा व सांस्कृतिक समिती अध्यक्षा इंदिरा सालीयान, सांस्कृतिक समिती सचिव ज्योती कडकोळ, सांस्कृतिक समिती सदस्य चंद्रकांत हारकुडे, संघाचे रामदास आचार्य व जी. सी. कुलकर्णी आदी या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. पुणे शाखेअंतर्गत पुणे जिल्हा घटक, आंबेगाव व हवेली तालुका घटक येणार असून यापैकी पुणे जिल्हा घटक व आंबेगाव तालुका घटक यांची जबाबदारी पुण्यातील कन्नड संघावर टाकली आहे. तर कर्नाटक संघ हवेली तालुका घटकाची जबाबदारी पार पाडणार आहे. भविष्यात शाखेअंतर्गत संमेलने, परिषदा यांबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कलमाडी यांनी दिली.
कार्यक्रमामध्ये शाखेअंतर्गत येणाऱ्या घटकांच्या कार्यकारिणीची घोषणा केली. मालती कलमाडी या पुणे जिल्हा घटक अध्यक्षा म्हणून तर, ज्योती कडकोळ व नंदिनी राव गुजर या सचिव म्हणून काम पाहतील. आंबेगाव तालुका घटक अध्यक्षपदी बालाजित शेट्टी, तर सचिवपदी पुष्पा हेगडे व चंद्रकांत हारकुडे यांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच कृष्णा ममदापूर हे हवेली घटकाचे अध्यक्ष म्हणून तर लता कुलकर्णी व स्वाती ढोले या सचिव म्हणून काम पाहणार आहेत.