पुणे : पुणे महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात १४१ मूर्तीसंकलन केंद्रे, १५९ निर्माल्य संकलन केंद्रे उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरात नागरिकांना गणेश विसर्जन करण्यासाठी ८१ विसर्जन रथ तयार करण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागांत हे रथ असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटावर किंवा महापालिकेच्या हौदांवर नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी शहराच्या सर्व भागात विसर्जन रथांची व्यवस्था करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर मिळून ३८, नगरसेवकांच्या वतीने २५ आणि महापालिकेच्या घनकचरा विभागाचे १८ रथ शहरात कार्यरत असणार आहेत.
नागरिकांच्या सोईसाठी मूर्ती संकलन केंद्रेही उभारण्यात आली आहेत. याठिकाणी नागरिक आपल्या मूर्तींचे दान करू शकतील. अर्धा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन शुक्रवारी झाले. यावेळी २२ मूर्ती संकलन झाले. विसर्जन रथात १५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
घराच्या घरी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकरिता पुणे महापालिकेने एकूण २२ टन अमोनियम बायकार्बोनेट सर्व क्षेत्रीय कार्यालयांव्दारे, प्रत्येक आरोग्य कोठ्यांच्या ठिकाणी आणि गणेशमंडळाच्या ठिकाणी नागरिकांना मोफत वाटण्याची व्यवस्था केली आहे.
गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात पुणे महापालिका स्वच्छ सहकारी संस्थेमार्फत एकूण ८७ हजार ४४२ किलो निर्माल्य गोळा करण्यात आले होते. यावर्षी देखील सर्व गणेशमूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचबरोबर निर्माल्याचे वेगळे संकलन करून ठेवणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन, सर्व निर्माल्य कचरा वेचकांमार्फत अथवा घंटागाडीमार्फत ओला-सुका कचरा व्यतिरिक्त वेगवेगळ्या पोत्यांमधून दि. १२, १५ आणि २० सप्टेंबर २०२१ रोजी घेतले जाणार आहे़ कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.