पिंपरी : परराज्यातील तसेच परदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून लाॅजमध्येे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. यात १० महिलांची सुटका केली. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुकाई चौक, मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत, किवळे येथील व्दारका लाॅजिंग अँड बोर्डिंग येथे सोमवारी (दि. ६) सायंकाळी पाचच्या सुमारास सामाजिक सुरक्षा पथक तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने ही कारवाई केली.
लाॅजचा मॅनेजर गवी रंगा कृष्णा गोवडा (वय ३८, रा. किवळे, मूळपत्ता बोईसर, मुंबई), लाॅजचा चाकल-मालक प्रताप शेट्टी (वय ४०, सध्या रा. कात्रज, मूळपत्ता उडपी, कर्नाटक) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप शेट्टी हा जबरदस्तीने मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतो, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकातील पोलिसांनी व्दारका लाॅजिंग अँड बोर्डिंग येथे छापा मारला. यात एक परदेशी, सहा परराज्यातील तसेच राज्यातील तीन, अशा एकूण १० पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच आरोपींकडून ११ हजार ४०० रुपयांची रोकड, १४ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, ३०० रुपये किमतीचे इतर साहित्य, असा एकूण २५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सहायक पोलीस आयुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डाॅ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, भगवंता मुठे, अनिल महाजन, जालिंदर गारे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, राजेश कोकाटे, योगेश तिडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.