पुणे: प्रकल्पबधितांचे गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 05:37 PM2021-11-25T17:37:39+5:302021-11-25T17:40:17+5:30
बापट साहेब, पवार साहेब तुम्ही आमचे जीवन उध्वस्त केले अशा आशयाचा फलक गळ्यात टांगवत आंदोलनकर्त्यांनी राजकारण्यांचा निषेध केला...
पुणे: कामगार पुतळा वसाहत येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून आंदोलन केले. विधान भावनासमोर झालेल्या या आंदोलनात जवळपास १०० महिला व पुरुष आंदोलकांनी भाग घेतला होता. यावेळी नागरिकांना राज्य सरकार, पुणे महामेट्रो विरुद्ध घोषणा देत आपला निषेध व्यक्त करीत होते. बापट साहेब, पवार साहेब तुम्ही आमचे जीवन उध्वस्त केले अशा आशयाचा फलक गळ्यात टांगवत आंदोलनकर्त्यांनी राजकारण्यांचा निषेध केला.
आमचा मेट्रोला विरोध नसून आमच्या लांब होत असलेल्या पुनर्वसनाला विरोध आहे. पुनर्वसन लांब झाल्याने कामगार वसाहत असलेल्या आमच्या रोजगार, शिक्षण, पाणी आदींची समस्या निर्माण होणार असून शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात गुरांचा जुना दवाखाना, आरे दूध डेअरी, एस ती स्टँड नवीन वाकडेवाडी, संगमवाडी येथील शासनाचा पडीक भूखंड अनेक ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी आमचे पुनर्वसन करावे असे आंदोलकांनी लोकमत शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
बबन भालके (आंदोलक)- पूर्वीच्या व्यवस्थेने दलित समाजाची गळ्यात मडक आणि पाठीला झाडू अशी व्यथा केली होती. तीच व्यथा आमचे शिक्षण, रोजगार, आरोग्य हिसकावून दूर केल्या जाणाऱ्या पुनर्वसनातून शासन करीत आहेत, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करीत आहोत.
मयूर घोंडे (आंदोलक)- प्रकल्पाच्या नावाखाली आमच्या भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगार, शिक्षण, आरोग्य समस्येबाबाबत आम्ही तडजोड करू शकत नाही. शासनाची ही कृती म्हणजे आम्हाला पुन्हा लाचार करणे होय.