'पद्मावत'ला विरोधासाठी पुण्यात वाहनांची तोडफोड, दगडफेक करून फोडल्या गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 10:11 AM2018-01-24T10:11:10+5:302018-01-24T10:12:08+5:30
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या दिवसावर आलं आहे.
पुणे- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या दिवसावर आलं आहे. उद्या (25 जानेवारी) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटील येतोय. पण सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही केल्या दूर होत नाहीत. सिनेमाला विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी निदर्शनं होताना दिसत आहे. पुण्यामध्येही पद्मावत सिनेमाला विरोध करण्यात आला. सिनेमाला विरोध करण्यासाठी 20 ते 25 जणांच्या जमावाने पुणे शहरातून जाणाऱ्या सातारा - मुंबई महामार्गावरील वाहनावर दगडफेक करून तोडफोड केली. या दगडफेकीत किमान 10 वाहनाचं नुकसान झालं आहे. ही घटना महामार्गावरील वडगाव पुलालगतच्या सर्व्हिस रोडवर मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली.
पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी यापूर्वी पुणे शहरात करणी सेनेने मोर्चा काढला होता. सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. 25 जानेवारीला भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यापूर्वीच पुण्यात वाहनांची तोडफोड करण्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी महेश भापकर यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ते आपल्या चालकास ट्रक घेऊन कुर्ला येथे जात होते. वडगाव पुलाजवळ ते आले असताना 20 ते 25 जणांचा जमाव अचानक गाडी समोर आला. त्यामुळे गाडी थांबविली असताना लोकांनी दगड मारून काचा फोडल्या व टायरमधील हवा सोडून दिली.
त्यांच्या मागोमाग येणाऱ्या 8 ते 10 वाहनांच्या काचा फोडून टायरमधील हवा सोडून दिली व पद्मावत सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशा घोषणा दिल्या. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून या घटनेनंतर वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.