अभिमानास्पद ! हिंदू व बाैद्ध समाजाने मशीद बांधण्यासाठी घेतला पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 07:07 PM2020-02-06T19:07:16+5:302020-02-06T19:42:24+5:30
काेरेगाव भीमा येथील मशीद बांधण्यासाठी येथील हिंदू आणि बाैद्ध बांधवांनी पुढाकार घेत लाेकवर्गणी जमा केली.
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील जामा मशीद बांधणीसाठी हिंदू व बौद्ध समाजाने लोकवर्गणीद्वारे पुढाकार घेतला. सामाजिक ऐक्य जपण्यासाठी टाकलेल्या या पावलामुळे ग्रामस्थांची सामाजिक वीण अधिक घट्ट होण्यास मदत होत आहे.
कोरेगाव भीमा परिसरामध्ये गेल्या दाेन - तीन वर्षांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमाच्या नावलौकिकात डाग लागलेला असल्याने सामाजिक तणाव निर्माण झाला होता. मात्र या अप्रिय घटनांतून प्रत्येक वेळी सामाजिक ऐक्य अबाधित राहण्यासाठी पुढाकार घेत असतानाच गेल्या काही वर्षांपासून कोरेगाव भीमात महापुरुषांच्या जयंत्या, राष्ट्रीय सण, उत्सव यांसह विविध उपक्रमांद्वारे सर्वधर्मसमभावाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करून सर्व समाजाला एकत्र करीत सामाजिक वीण पुन्हा दृढ करण्याचा प्रयत्न केला. यात आज एक पाऊल पुढे टाकीत कोरेगाव भीमा मशीद वाढीव इमारत बांधकामातही आज सामाजिक ऐक्य सर्व समाजाने दाखवून देत सामाजिक सलोखा जपण्याचे काम केले.
यावेळी विठ्ठलराव ढेरंगे, पी. के. गव्हाणे, नारायणराव फडतरे, राजाराम ढेरंगे, अशोक गव्हाणे, विक्रमराव गव्हाणे, कैलासराव सोनवणे, अनिल काशीद, बाळासाहेब फडतरे, विजय गव्हाणे, संजय काशीद, अशोक काशीद, संदीप ढेरंगे, महेश ढेरंगे, केशव फडतरे, विक्रम दौंडकर, बबनराव गव्हाणे, पोपट ढेरंगे, दत्तात्रय ढेरंगे, अरविंद गव्हाणे, कांतीलाल फडतरे, नीलेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे, आशा काशीद, मालन साळुंके, विलास खैरमोडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोरेगाव भीमातील सर्व प्रमुखांनी मशीद बांधकामासाठी देणगी देत यापुढेही गावातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करतानाच तरुणांनीही सामाजिक भान जपण्यासाठी ज्येष्ठांनी मार्गदर्शक बनण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले.