वाहनाच्या धडकेने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:26 PM2018-03-27T16:26:01+5:302018-03-27T16:26:01+5:30
सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लिमिटेड टर्मिनल गेट क्रमांक एक समोर आले.त्यावेळी एका अज्ञात वाहन भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली.
लोणी काळभोर : मुळ गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटाचे आरक्षण करून हॉटेलकडे चालत निघालेल्या परप्रांतीय हॉटेल कामगारांस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जागीच मृत्यूमुखी पडला. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुणे - सोलापूर महामार्गावर घडली. या अपघातात मोहन गिरी गोस्वामी ( वय ४३, सध्या रा. हॉटेल ग्रॅन्ड इलेव्हन, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत शेजारी, ता. हवेली. मुळ-उत्तराखंड ) हे मृत्यूमुखी पडले आहेत. यासंदर्भात त्यांचे पुतणे जगतगिरी पानगिरी गोस्वामी (वय २७, सध्या रा. हॉटेल गारवा हिल्स, येवलेवाडी, कोंढवा, मूळ-उत्तराखंड) यांनी फिर्याद दिली आहे.
मोहन गिरी गोस्वामी हे आज मंगळवार (दि.२७ मार्च ) रोजी आपल्या मुळ गावी परतणार असल्याने ते सोमवारी पुणे येथे गेले होते. तेथे त्यांनी घरी नेण्यासाठी आवश्यक ती सर्व खरेदी केली. त्यानंतर पुणे स्टेशन रेल्वे स्थानकावर जाऊन तिकीट आरक्षण केले. व रेल्वेने लोणी स्टेशन येथे आले. तेथून पुणे - सोलापूर महामार्गावरून हॉटेलकडे पायी चालत निघाले. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लिमिटेड टर्मिनल गेट क्रमांक एक समोर आले.त्यावेळी एका अज्ञात वाहन भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. उपचारासाठी तात्काळ लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये दाखल केले. परंतू तपासणी करून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.