पुणे : तरुणींच्या व्हॉट्सॲप, फेसबुकवरील फोटोचा वापर करून त्यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारे महिलांना कॉलगर्ल असल्याचे भासवून त्रास दिला जातो, त्यांची बदनामी केली जात असल्याची शेकडो उदाहरण समोर आली आहेत. मात्र, एका मनोविकारतज्ञ असलेल्या महिलेने मानसिक रुग्ण असल्याप्रमाणे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डॉक्टर असलेल्या महिलेने चक्क सोसायटीच्या चेअरमनच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट काढून त्याची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी उंड्री येथे राहणाऱ्या एका ३७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी बिबवेवाडी येथील एका डॉक्टर असलेल्या महिलेविरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० ते २३ जूनमध्ये घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथे राहणारे फिर्यादी हे त्यांच्या सोसायटीचे चेअरमन आहेत. सोसायटीत कोणी गैरकाम केले असेल तर त्यांना राेखणे व नोटीस देणे असे काम चेअरमन म्हणून करावे लागते. एके दिवशी सोसायटीतील एका महिला या फिर्यादीकडे आल्या व त्यांनी तुम्ही असे कसे मेसेज पाठविता, असे म्हणून रागावल्या. तुम्ही मला प्रायव्हेटमध्ये भेटा, तुमच्याकडे काम आहे, असे त्या मेसेजमध्ये म्हटले होते. फिर्यादी यांनी असा कोणताही मेसेज आपण पाठविला नसल्याचे सोसायटीतील संबंधित महिलेला सांगितले. त्या इन्स्टाग्राम अकाऊंटही आपले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी या स्कीन शॉटसह सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
सायबर पोलिसांनी तपास केल्यावर धक्कादायक बाब समोर
सायबर पोलिसांनी तपास केल्यावर धक्कादायक बाब समोर आली. फिर्यादी यांच्या नावाने त्यांच्याच सोसायटीत राहणाऱ्या एका मनोविकारतज्ञ महिलेने हे बनावट इन्स्टाग्राम तयार केल्याचे व त्यावरून सोसायटीतील महिलांना जाणीवपूर्वक बदनामकारक मेसेज पाठविल्याचे आढळून आले. चेअरमन म्हणून काम करीत असताना या महिला डॉक्टरने चुकीचे काम केले असल्याने त्यांनी या डॉक्टर महिलेला २-३ नोटिसा पाठविल्या होत्या. त्याच्या रागातून त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकूळ राऊत अधिक तपास करीत आहेत.