शहरात होळी, धूलिवंदन उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:05+5:302021-03-25T04:11:05+5:30
पुणे : कोरोना संसर्गाच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर होळी व धूलिवंदन उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्यावर पुणे महापालिकेने बंदी घातली आहे़ सदर ...
पुणे : कोरोना संसर्गाच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर होळी व धूलिवंदन उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्यावर पुणे महापालिकेने बंदी घातली आहे़ सदर आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ नुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़
याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी आदेश दिले आहेत़ शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने, २८ मार्च रोजी असलेला होळी सण व २९ मार्च रोजीचा धूलिवंदन सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे़ यामुळे हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व सोसायट्यांमधील मोकळ्या जागा, रस्ते, मैदाने, उद्याने, शाळा इत्यादी ठिकाणी हे दोन्हीही सण साजरे करता येणार नाहीत़ तर ‘मी जबाबदार’ मोहिमेंतर्गत वैयक्तिकरीत्यासुध्दा शक्यतो हा उत्सव साजरा करणे टाळावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.