पुणे : वेल्हा तालुक्यासाठी न्यायालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनअदालत संस्थेतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.जनअदालत संस्थेचे तालुका प्रमुख अॅड. विजय झांजे यांनी वेळोवेळी यासंदर्भात पुणे जिल्हा न्यायालय प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, जिल्हाधिकारी, वेल्हा तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र या कोणतीही ठोस पावले उचलण्यात न आल्यामुळे अॅड. झांजे यांनी अॅड. उदय वारूंजीकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. सागर नेवसे यांनी दिली. वेल्हा तालुका पुण्यापासून ७५ किमी अंतरावर आहे. वेल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी केसेस या पुणे जिल्हा न्यायालय आवारात चालतात. वेल्हे तालुक्यामध्ये एकूण १२४ महसुली गावे आणि ३० - ३५ वस्त्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय नसल्यामुळे तारखेसाठी पक्षकार, वकील, फिर्यादींना पुणे जिल्हा न्यायालयात वेळोवेळी हजर राहावे लागते. अनेक लोकांना वारंवार पुण्यात येणे शक्य होत नाही. न्यायालयास विनाभाडे तत्वावर इमारत उपलब्ध होण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. वेल्हा येथील जुनी तहसील इमारत उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषद वेल्हा येथील जुनी पंचायत समितीची इमारत भाडे तत्वावर देण्यास तयार आहे. जनअदालत संस्थेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, असे अॅड. नेवसे यांनी सांगितले.
वेल्हा तालुक्यात न्यायालय स्थापन करण्यासाठी जनहित याचिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:25 AM
वेल्हा तालुका पुण्यापासून ७५ किमी अंतरावर आहे. वेल्हे तालुक्यामध्ये एकूण १२४ महसुली गावे आणि ३० - ३५ वस्त्या आहेत.
ठळक मुद्देयाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन मात्र त्याची दखल नाही