पार्कींगसाठी अाता सार्वजनिक रस्ता सुद्धा अारक्षित ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 08:28 PM2018-04-17T20:28:33+5:302018-04-17T20:28:33+5:30
पर्वती येथील दाेन साेसायटीच्या रहिवाश्यांनी सार्वजनिक रस्ताच्या बाजूला असलेल्या भिंतीवर साेसायटीतील रहिवाश्यांच्या चारचाकींचे क्रमांक टाकून जागा अारक्षित केली असल्याचे समाेर अाले अाहे.
पुणे : कुठं कुठं शाेधू कुठं, पार्किंग अाता शाेधू कुठं असंच काहीसं म्हणण्याची वेळ पुणेकरांवर अाली अाहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात पार्किंगची भीषण समस्या निर्माण झाली अाहे. पर्वती येथील दाेन साेसायटीतील रहिवाश्यांनी तर अाता चक्क सार्वजिनक रस्त्यावर अापल्या वाहनांसाठी हक्क सांगितला असून रस्त्याच्या कडेच्या भिंतीवर चारचाकी गाड्यांचे क्रमांक टाकण्यात अाले अाहेत. एकिकडे पालिका सार्वजनिक रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पैसे अाकारण्याचा विचार करत असताना अाता सार्वजनिक रस्ते सुद्धा नागरिकांकडून अापल्या वाहनांसाठी अारक्षित करण्यात येणार का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला अाहे.
पुण्यात लाेकसंख्येपेक्षा अधिक वाहनांची संख्या अाहे. पालिकेकडून सर्व सार्वजनिक रस्त्यांवर पे अॅण्ड पार्क करण्याचा प्रस्ताव अाणण्यात अाला हाेता. वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंगचा माेठा प्रश्न निर्माण झाला अाहे. खासकरुन शहराच्या मध्यवस्तीतील पेठांमधील लाेकांना पार्किंगसाठी मनस्ताप सहन करावा लागत अाहे. पर्वती भागातील दाेन साेसायट्यांनी अापल्या इमारतीसमाेरील सार्वजनिक रस्त्यावरील भिंतीवर साेसायटीचे नाव व येथील रहिवाश्यांच्या चारचाकी वाहनांचे क्रमांक टाकण्यात अाले अाहेत. या ठिकाणी काेणीही वाहने लावून जात असल्याने तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी काही लाेक गाड्यामध्ये बसून दारु पित असल्याने येथील रहिवाश्यांच्या गाड्यांचे क्रमांक टाकल्याचे येथील रहिवाश्यांचे म्हणणे अाहे. मात्र सार्वजनिक रस्त्याच्या भिंतीवर अश्याप्रकारे चारचाकी गाड्यांचे क्रमांक टाकणे याेग्य अाहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
येथील एका साेसायटीचे सेक्रेटरी राजाभाऊ शेंडगे म्हणाले, या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही समाजकंटक दारु पित असतात, त्यामुळे येथील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. तसेच या ठिकाणी काेणीही गाडी लावून जात असून अनेकदा दिवसेंदिवस ती गाडी येथेच उभी असते. काही जाेडपी रात्रीच्या वेळी या भागात गाडी लावत असतात. तर लघुशंकेसाठी सुद्धा या ठिकाणांचा वापर करण्यात येत असल्याने साेसायटीने असे गाड्यांचे क्रमांक या भिंतींवर टाकले अाहेत. येथे घडणाऱ्या घटनांबाबत अाम्ही वेळाेवेळी पाेलीसांनाही कळवले अाहे. मात्र कारवाई हाेताना दिसत नाही. येथील रहिवाश्यांच्या गाड्यांचे क्रमांक टाकल्यामुळे बाहेरील लाेकांकडून या ठिकाणी गाड्या लावण्याचे प्रमाण कमी झाले अाहे.
अलका कुंभार म्हणाल्या, रात्रीच्या वेळेस काही लाेक येथे वाहने लावून दारु पित असतात. तसेच कचराही टाकला जाताे. त्यामुळे येथील रहिवाश्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही यामुळे निर्माण हाेत अाहे.
या भागात अनेक जुन्या गाड्या पडून असून त्यातील काही वाहनांना महापालिकेने नाेटिसही चिकटवली अाहे. तरीही त्या गाड्या तेथेच पडून असल्याचे चित्र अाहे. तसेच भिंतीच्या कडेला रिकाम्या दारुच्या बाटल्या पडलेल्या दिसून येतात. या तळीरामांना कंटाळून भिंतीवर गाड्यांचे क्रमांक टाकल्याचे येथील रहिवाश्यांचे म्हणणे अाहे.