पुणे: जागतिक योग दिनानिमित्त पुण्यात देशभक्तीपर गीतांच्या तालावर १०० जणांनी सलग दोन तास विविध आसनांच्या माध्यमातून योग केला आहे. सर्वांनी कलेच्या सादरीकरणातून योग आसने केल्याने एक विश्वविक्रमी नोंद झाली आहे. त्यातून कलेचा आणि आरोग्याचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये सूर्यदत्ता फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सुर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या 'कलाआरोग्यम् योगाथॉन'ची दखल विविध बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले आहे. 'सूर्यदत्ता'च्या बावधन कॅम्पसमध्ये हा 'योगाथॉन' झाला, असे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
योगाच्या मदतीने मन व शरीर, आचार-विचार, कृती, संयम, सकारात्मक भावना आदी गोष्टींचा समतोल साधला जातो. योग मानवाला निसर्गाशी एकरूप व्हायला लावतो. योगसाधनेमुळे शारीरिक व्यायामासह मानसिक आणि भावनिक कक्षा विकसित होतात. योग म्हणजे कलेचा, क्रयशीलतेचा, नावीन्यतेचा, उपक्रमशीलतेचा, सकारात्मक विचारांचा स्रोत आहे. गाण्यांच्या तालावर आधारित या आर्टिस्टिक योगाची तयारी महिन्याभरापासून सुरु होती. शिक्षक-शिक्षकेतर सर्वच कर्मचारी यामध्ये उत्साहाने सहभागी झाले. असेही ते म्हणाले आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या सरिताबेन राठी यांच्या सलग दोन तास उत्कृष्ट योग करणाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया उपस्थित होते. ज्युरी म्हणून वैद्य हरीश पाटणकर, योगपटू खुशी परमार, नुपूर पित्ती यांनी काम पाहिले. सोनाली ससार यांनी योग प्रत्याशिके घेतली.