पुणे: सावत्र आईची हत्या करणारा आरोपी गजाआड, दिल्लीतून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 08:11 PM2022-07-22T20:11:05+5:302022-07-22T20:11:05+5:30
भोर पोलिसांच्या पथकाने दिल्लीत घेतले ताब्यात...
भोर (पुणे) :भोर शहरातील सावत्र आईचा धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यानंतर डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करणारा शिवम अकुंश शिंदे याला नवी दिल्लीतून गुरुवारी (दि. २१) भोर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन अखेर गजाआड केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर येथील धन्वंतरी हाईट्स येथील रेश्मा अंकुश शिंदे (वय ३६, रा. बाजारवाडी, ता. भोर) हिच्या सोबत अंकुश शिंदे यांनी दुसरे लग्न केले होते. या कारणावरून अंकुश शिंदे याची पहिली मयत पत्नी हिचा मुलगा शिवम अंकुश शिंदे (वय २१) याने रेश्मा शिंदे हिचा गळा चिरला. तसेच डोक्यात पाट्याचा दगड मारून खून केला आणि फरार झाला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत होते. गुन्ह्यातील आरोपी शिवम शिंदे हा एका ठिकाणी न राहता कोल्हापूर, आंध्रप्रदेश तिरुपती, तेलंगणा, ओरिसा, मुंबई, मध्यप्रदेश व हरयाणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. गेल्या ३ दिवसांपासून दिल्ली येथे एका स्वीट मार्टच्या दुकानात तो पार्सल पोहच करण्याचे काम करीत होता.
दरम्यान, तांत्रिक तपास व कौशल्याच्या सहायाने गुरुवार (दि. २१) रोजी दिल्ली येथून त्याला ताब्यात घेतले. भोर पोलीस ठाण्यात आणून त्यास गुन्ह्यामध्ये अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. भोर कोर्टात हजर केले असता त्यास ४ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक शेळके, पोलीस हवालदार विकास लगस, अजय साळुंके, दत्तात्रय खेंगरे, चेतन पाटील, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके यांनी केली आहे.