पंढरीनाथा पाऊस दे ! पुणे परिसराला अजूनही वरुणराजाची प्रतीक्षा !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 04:00 PM2018-07-03T16:00:15+5:302018-07-03T16:00:22+5:30
मागील वर्षाच्या सरासरीएवढाही पाऊस अजून पडला नसल्याने पुणे शहरासह जिल्ह्यावर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.काही ठिकाणी पाऊस असला तरी अद्यापही हवी तेवढी ओल निर्माण न झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्याची खोळंबल्या आहेत.
पुणे : मागील वर्षाच्या सरासरीएवढाही पाऊस अजून पडला नसल्याने पुणे शहरासह जिल्ह्यावर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.काही ठिकाणी पाऊस असला तरी अद्यापही हवी तेवढी ओल निर्माण न झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्याची खोळंबल्या आहेत. त्यातच गुरुवारी (दि.५) आणि शुक्रवारी (दि.६)रोजी अनुक्रमे संत तुकाराम महाराज आणि माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. वारी निघताना पाऊस आला तर वर्षभर पुरेल इतका पाऊस पडून शेतकऱ्याचे वर्ष चांगले जाते अशी समजूत आहे. त्यामुळे त्याकाळात पाऊस यावा अशी प्रार्थना केली जात आहे.
मागील वर्षी आजच्याच दिवशी खडकवासला धरण साखळीत २० टक्के इतके पाणी शिल्लक होते. यंदा मात्र फक्त १२.३७ टक्के इतके पाणी शिल्लक आहे. यामुळे सगळ्यांनाच चिंता लागली असून मुसळधार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. सध्या हवामान खात्याने पुढील दोन दिवसात राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने त्याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. याच खडकवासला धरण साखळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या धरणातून पुणे शहराला पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो. यातील टेमघरची क्षमता ३.७१ टीएमसी, पानशेतची क्षमता १०.६५ टीएमसी, वरसगावची क्षमता १२.८२ टीएमसी,खडकवासला धरणाची क्षमता १. ९७ टीएमसी आहे. वेळेत आणि पुरेसा पाऊस न झाल्यास शहरावर आगामी वर्षात पाणीकपातीचे संकटही ओढवू शकते.