Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:52 AM2023-06-27T11:52:04+5:302023-06-27T11:52:30+5:30

मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे हवेली पोलिसांच्या वतीने स्वागत

Pune: Bakri Eid will also be celebrated on Ashadhi Ekadashi this year; A commendable decision of the Muslim brothers | Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

googlenewsNext

धायरी : ‘अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठुमय झालं असून, अवघ्या एका दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे यंदा याच दिवशी बकरी ईदसुद्धा साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा आदर्श निर्णय खडकवासला येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.

हरिनामाचा गजर करत दिंड्या पताका घेऊन पायी दिंडी सोहळा सुरू आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला आहे. येत्या गुरुवारी (दि. २९) आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यंदा आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद येत आहे. त्यामुळे दोन सणांचा अनोखा संगम यानिमित्ताने होत आहे. हवेली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल यांनी खडकवासला येथील बिलाल मस्जिदमध्ये जाऊन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. तसेच ईदच्या दिवशी नमाज अदा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव मस्जिदमध्ये येत असल्याने वाहतुकीचेही नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र बकरी ईदला होत असलेली कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेतला जात आहे. ईदनिमित्त सकाळी नमाज पठण करत त्या दिवशी कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा कौतुकास्पद निर्णय हवेली पोलिस ठाणे हद्दीतील खडकवासला येथील सर्व मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यंदा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण एकाच दिवशी येत आहे. या पार्श्वभूमीवर हवेली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांनी हद्दीतील मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या. मात्र बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी स्वखुशीने त्यांची बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दिवशी न देता एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.

 बिलाल मस्जिद ट्रस्टच्या वतीने नेहमीच पुढाकार

आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही जनावरांची कुर्बानी दिली जाणार नाही, असा निर्णय बिलाल मस्जिद ट्रस्टने घेतला आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी बिलाल मस्जिद ट्रस्टने नेहमीच पुढाकार घेतला आहे. याबाबत परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना माहिती देण्यात येत असून, जाहीर आवाहनही करण्यात आले आहे. - नूर सय्यद, अध्यक्ष बिलाल मस्जिद ट्रस्ट, खडकवासला 

 हवेली पोलिसांच्या वतीने स्वागत

आजपर्यंतच्या इतिहासात कधीही येथे शांततेचा भंग झालेला नाही. यापुढेही हीच परंपरा कायम राहील. बिलाल मस्जिद ट्रस्टने घेतलेला निर्णय सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे हवेली पोलिसांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. - आयपीएस अनमोल मित्तल, प्रभारी अधिकारी, हवेली पोलिस ठाणे

Web Title: Pune: Bakri Eid will also be celebrated on Ashadhi Ekadashi this year; A commendable decision of the Muslim brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.