पुणे : वाचन चळवळीला सक्षम करण्यासाठी आणि पुण्याला नवी ओळख देण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच पुणे दौरा असल्याने, सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे उद्घाटन समारंभाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी मंगळवारी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत पांडे बोलत होते. यावेळी संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात सुरू असून, उद्घाटनाचा कार्यक्रम हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत जल्लोषात होणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.
पांडे म्हणाले की, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. देवेंद्र फडणवीस महोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलला भेट देऊन, लेखक, साहित्यिक, प्रकाशकांशी संवाद साधणार आहे. या निमित्ताने पुणेकरांना देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल. उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेजवर होणार आहे. या कार्यक्रमाला कुलगुरू, साहित्यिक, लेखक, कवी, चित्रकार, संपादक, प्राचार्य अशी मंडळी उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असल्याने, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाचन संस्कृतीला वाढविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन पांडे यांनी केले.आज 'शांतता...पुणेकर वाचत आहे' उपक्रमात सहभागी व्हा
पुणे शहरात ' शांतता...पुणेकर वाचत आहे' हा उपक्रम बुधवारी ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत अप्पा बळवंत चौकसह, शाळा, महाविद्यालये, पुणे मेट्रो स्टेशन, पीएमपीएमएल बसथांबे, विमानतळ, कारागृह, वाचनालये, ग्रंथालये अशा शेकडो ठिकाणी उत्साहात होणार आहे. हा उपक्रम सामाजिक संस्था आणि संघटनांनी उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे. पुणेकरांनी आज १२ ते १ या वेळेत असेल त्या ठिकाणी आपल्या आवडीचे पुस्तक वाचून, वाचन चळवळ बळकट करण्यासाठी योगदान द्यायचे आहे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.
ज्ञानसरिता दिंडीचे आयोजन
पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन होण्यापूर्वी शहरात नाविन्यपूर्ण ज्ञानसरिता दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न १०१ महाविद्यालयातील दिंड्या सहभागी होणार आहेत. पुणे परिसरातील संत, क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत यांच्या कार्यावर आधारित दींड्या राहणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व विचारांची दिंडी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश शाळेतून सुरू होऊन, फर्ग्युसन महाविद्यालयात येणार आहे, अशी माहिती बागेश्री मंठाळकर यांनी दिली.