Pune Breaking: पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई इमारतीच्या लाकडी भागाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 01:21 AM2021-06-11T01:21:45+5:302021-06-11T01:29:29+5:30
ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागातील लाकड़ी भागाला आग लागली.
पुणे: काही दिवसांपूर्वीच मुळशी तालुक्यातील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागातील लाकडी भागाला आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ३ गाड्या आणि पाण्याचा १ टँकर घटनास्थळी दाखल झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले, "ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागातील लाकड़ी भागाला आग लागली. अग्निशामन दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. आगीचे कारण, इमारतीचे नुकसान किती झाले हे आत्ता लगेच सांगता येणार नाही."
अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, मनीष बोंबले, अजीम शेख, यांच्यासह सुरेश पवार, संतोष आरगडे, संदीप थोरात, अक्षय दीक्षित, नरेश पांगरे, रोहित रणपिसे या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.