पुणे : सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलेल्या प्रौढ व्यक्तीच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याची घटना घडलीय आहे. शुक्रवारी सकाळी वारज्यातील म्हाडा कॉलनी रस्त्यावर घडली. मूळचे नाशिकमधील असलेले विनायक हरी बर्वे (वय 54 वर्ष ) यांनी फिर्याद दिली आहे. बर्वे हे सेवानिवृत्त असून त्यांची बहीण पुण्यामध्ये राहण्यास आहे. बहिणीला भेटण्याकरिता ते नाशिकहून आले होते. वारज्यातील आदित्य गार्डन सिटी सोसायटीमध्ये बर्वे बहिणीकडे मुक्कामाला थांबले होते. शुक्रवारी सकाळी फेरफटका मारायला ते बाहेर पडले. म्हाडा कॉलनीकडे जाणा-या रस्त्यावरुन ते जात होते. हा रस्ता निर्मनुष्य होता. दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांना थांबवले.
ओव्हलनेस सोसायटी कुठे आहे असे विचारीत आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत आरोपींनी पळ काढला. हे आरोपी साधारणपणे 22 ते 23 या वयोगटातील असावेत, असा अंदाज त्यांनी पोलिसांजवळ व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव मोळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. हा रस्ता निर्मनुष्य आणि फारशा वर्दळीचा नसल्याने याभागात सीसीटीव्हीही नाहीयेत. तरीही या रस्त्याला जोडणा-या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत याची चाचपणी सुरु करण्यात आल्याचे मोळे यांनी सांगितले. वर्णनावरुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.