औंध : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सायकलींचा समावेश करून सुरू केलेल्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या महिन्यात या सार्वजनिक सेवेतील सायकलींची २५ हजार ७३८ एवढी बुकिंग झाली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व औंधमध्ये महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते. ‘झूमकार पीईडीएल’च्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला दोन्ही ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या सेवेस प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात साडेपाच हजारांहून अधिक नागरिकांनी सायकलस्वारीचा आनंद घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण १४ हजार ३२१ इतक्या सायकल फेऱ्या झाल्या, तर औंध परिसरात सायकल फेºयांची संख्या ११ हजार ४१७ इतकी आहे.औंध परिसरात दहाहून आधिक ठिकाणी सायकल स्टँडची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यापासून ज्येष्ठ नागरिक, असे सर्वच जण सायकलस्वारीचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. संपूर्ण पुणे शहरात सर्वच ठिकाणी अशी व्यवस्था असावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत औंधमध्ये होत असलेली विकासकामे तसेच उपलब्ध झालेल्या विविध सुविधांमुळे परिसराचा झपाट्याने कायापालट झाला आहे. पब्लिक बायसिकल शेअरिंग हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून आरोग्याच्या व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने असे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. अत्यल्प भाडे आणि त्वरित उपलब्ध होत असल्याने या सायकलीचा वापर सोयीचा ठरला आहे.- अनिल चैतन्य, ज्येष्ठ नागरिक