धुक्यात हरवलं पुणे शहर; संपूर्ण शहरावर धुक्याची चादर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 10:22 AM2017-10-12T10:22:53+5:302017-10-12T10:25:04+5:30
गेले दोन दिवस सुरू असलेला जोरदार पाऊस , त्यात मधूनच सूर्यनारायनाच्या प्रखर किरणाने जाणवणारा उष्मा याचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना आज पहाटे संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले.
पुणे : गेले दोन दिवस सुरू असलेला जोरदार पाऊस , त्यात मधूनच सूर्यनारायनाच्या प्रखर किरणाने जाणवणारा उष्मा याचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना आज पहाटे संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले. एकाच दिवसात तिन्ही ऋतूचा अनुभव पुणेकरांना मिळाला.
पुणे शहरात गेले काही दिवस सकाळी अगदी कडक उन्हाचा चटका जाणवत होता. त्यानंतर दुपारी अचानक आकाशात ढगांची गर्दी होऊन जोरदार पाऊस होत होता. विशेषतः उपनगरात काही मिनिटात इतका जोरदार पाऊस पडत होता की, समोरचे काही दिसत नव्हते. रस्त्यांवर पाणीच पाणी होऊन वाहतूक कोंडी होताना दिसत होती. परतीचा पाऊस लांबल्याने अर्धा ऑक्टोबर महिना सरत आला तरी थंडीची चाहूलही नव्हती. असे असताना आज पहाटे फिरायला बाहेर पडलेल्याना एक वेगळेच दृश्य दिसले. संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले. शहरातील विविध टेकड्यांवर पहाटे फिरायला जाणाऱ्यांची पुण्यात मोठी संख्या आहे.
तळजाई, हनुमान टेकडी, पर्वती, वेताळ टेकडी येथे फिरायला जाणाऱ्यांना आज या हंगामातील पहिले दाट धुके पडलेले पहायला मिळाले. धुके पडायला सुरुवात झाली, याचा अर्थ पाऊस संपला असा घेतला जातो. थंडीत व्यायाम करायला टेकडीवर जाणाऱ्याच्या संख्येत मोठी वाढ होत असते.
आज तळजाई टेकडीवर फिरायला गेलेल्याना संपूर्ण टेकडीवर धुक्याची चादर पसरल्याचे अनुभव आला. धुके इतके दाट होते की काही अंतरावरच दिसत नव्हते. त्यामुळे वाहनांना हेड लाईट लावून गाडी चालवावी लागत होती. धुक्याने संपूर्ण शहराला आपल्या कवेत घेतल्याचे शहरातील विविध टेकड्यांवरून दिसून येत होते. सकाळी 7 नंतर धुके विरळ होत गेले. पहाटेच घराबाहेर पडलेल्यानी या हंगामातील पहिल्या धुक्याचा मनमुराद आनंद लुटला.