आरोग्य सेवेत पुणे शहर पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:24 AM2018-03-28T02:24:35+5:302018-03-28T02:24:35+5:30
स्मार्ट, मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या पुणे शहरामध्ये महापालिकेची आरोग्य
पुणे : स्मार्ट, मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या पुणे शहरामध्ये महापालिकेची आरोग्य सेवा नॅशनल हेल्थ पॉलिसीनुसार व आरोग्यविषयक मानांकानुसार पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णालयांची संख्या, बेड्सची संख्या, डॉक्टर, नर्सेस, कर्मचाऱ्यांची अपूर्ण संख्या, रुग्णालयातील अस्वच्छता, औषधांचा होणार पुरवठा, डॉक्टर व रुग्णसंवाद आदी सर्वंच गोष्टींमध्ये महापालिकेच्या आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे.
शहरात सध्या आरोग्याच्या उपलब्ध असलेल्या सुविधाबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी महापालिकेला प्रश्न विचारले होते. यावर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून आरोग्य सेवांचे वास्तव समोर आले आहे. शहरामध्ये सध्या महापालिकेच्या मालकीचे एकूण ४७ बाह्यरुग्ण व दवाखाने व दोन मोठी हॉस्पिटल्स आहेत. याशिवाय १७ प्रसुतीगृहांमधून शहरातील सर्वसामान्य पुणेकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आरोग्य विषयक राष्ट्रीय मानांकानुसार ‘नॅशनल हेल्थ पॉलिसीनुसार’ पुणे शहरात सरकारी, खासगी रुग्णालये मिळून १७ हजार ५०० बेड्स उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु सध्या पुणे शहरामध्ये महापालिकेच्या सर्व रुग्णालये, प्रसुतिगृहे मिळून केवळ १ हजार १४६ बेड्स आहेत. तर शहरातील अन्य खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या १४ हजार ७२३ इतकी आहे. यामुळे नॅशनल हेल्थ पॉलिसीनुसार सध्या शहरामध्ये तब्बल १ हजार ६३१ बेड्सची आवश्यकता आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण २१६ पदे मंजूर आहेत. परंतु, यापैकी सध्या १७७ डॉक्टरांची पदे भरलेली असून, ३९ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. याशिवाय नर्सेस, वॉर्ड बॉय व अन्य कर्मचारी अशी एकूण तब्बल ५०० पेक्षा अधिक पदे आरोग्य विभागात रिक्त असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांची संख्याच कमी असल्याने अनेक ठिकाणी प्रामुख्याने प्रसुतीगृहांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांना डॉक्टर नसल्याने ससून अथवा अन्य खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. उपलब्ध असलेले डॉक्टर कधीही वेळेवर हजर राहात नाहीत, अनेक महत्त्वाच्या औषधांचा साठा उपलब्ध नसतो, डॉक्टर, नर्स रुग्णालयात येणाºया पेशंटसोबत योग्य संवाद करत नाहीत, रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. रुग्णालय व परिसरात प्रचंड अस्वच्छता आदी सर्वच गोष्टींमुळे स्मार्ट, मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या पुणे शहरातील आरोग्याच्या सुविधांबाबत नॅशनल हेल्थ पॉलिसीनुसार खूपच पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेने शहराचा
स्वतंत्र हेल्थ प्लॅन करावा
स्मार्ट सिटीच्या गोष्टी करणाºया पुणे महापालिकेला सर्वसामान्य पुणेकरांच्या आरोग्याचे थोडेही गांभीर्य नाही. आरोग्य प्रमुखासह डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असताना याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, ही खेदाची बाब आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तातडीने ही सर्व पदे भरली पाहिजेत. रुग्णालयांची संख्या, बेड्सची संख्या वाढली पाहिजे. तसेच शहराच्या विकास आराखड्याप्रमाणेच आता पुणेकरांना चांगल्या, दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शहराचा स्वतंत्र हेल्थ प्लॅन तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
-विशाल तांबे,
नगरसेवक, महापालिका